वेंगुर्ले एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाद्वारे मागणी
वेंगुर्ला
वेंगुर्ले एसटी आगारातील राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज वेंगुर्ले आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आपल्या मागणीचे निवेदनही त्यांनी वेंगुर्ले नायब तहसीलदार शिंदे यांच्याकडे सादर केले.
राज्यातील 36 कर्मचाऱ्यांनी विलिनीकरण करण्यासाठी व तुटपुंजे तसेच अनियमित वेतन यांच्या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या आहेत. त्याचे पडसाद महाराष्ट्रातील बहुतेक एसटी आगारात काम बंद आंदोलन (संप) करून उमटत आहेत. त्यामुळे कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी होत आहेत. आज 8 नोव्हेंबर पासून वेंगुर्ले आगारातील कर्मचारी या काम बंद आंदोलनात (संपात) सहभागी झाले आहेत.
तरी आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे व्यक्त केली आहे. नायब तहसीलदार शिंदे यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी वेंगुर्ले आगारातील राज्य परिवहन विभागाचे कर्मचारी संतोष चव्हाण, मधुकर भगत, दामोदर खानोलकर, आशिष खोबरेकर, मनोज दाभोलकर, सखाराम सावळ, परेश धर्णे, सुनील मटकर, विशाल पेडणेकर आदींसह अन्य कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान या आंदोलनाला भाजपानेही पाठिंबा दिला असून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर हेही उपस्थित होते.