You are currently viewing युवासेना स्टाईल दाखवायची खुमखुमी जिरवायला भाजपा समर्थ!

युवासेना स्टाईल दाखवायची खुमखुमी जिरवायला भाजपा समर्थ!

टीका करणारच! राणेंच्या पेट्रोलपंपावर फुकटचा तमाशा करणाऱ्या वैभव नाईकांनी आता लुटारू राज्यसरकार विरोधात तोंड उघडुन दाखवावे – आनंद शिरवलकर

ठेकेदार शिवसैनिकांच्या भ्रष्टाचारी बांधकामांची चौकशी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी लावल्याने कुडाळ शिवसेनेला मिरची लागली आहे. त्यातूनच नेत्यांच्या बदनामीची तक्रार करून शिवसेनेना नेहमीप्रमाणे रडीचा डाव खेळत आहे. पोलीस तक्रारीच्या आडून भाजपा कार्यकर्त्यांवर बाण मारल्यास धनुष्यच तोडून टाकू असा इशारा भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिरवलकर यांनी दिला आहे.

युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे, पालकमंत्री ना उदय सामंत व शिवसेना नेत्यांबद्दल अश्लिल पोष्ट सोशल मिडीयावर टाकुन बदनामी करणा-यांवर गुन्हा नोंद करावा या मागणीचे निवेदन युवासेनेच्या वतीने युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट व शिवसेनेचे अतुल बंगे यांनी दिले आहे. या पोस्ट टाकणा-यांवर कडक कारवाई करावी अन्यथा युवासेना स्टाईल कारवाई होईल असा इशारा देऊन तशी तक्रार आज कुडाळ पोलीस स्टेशनला दिल्याचेही वृत्तवाहिन्यांकडून कळले.

मुळातच युवासेना स्टाईलने कारवाई करण्याची धमक या रडव्या शिवसैनिकांमध्ये असती तर खोट्या तक्रारी देऊन पोलिसांच्या पदराआड लपण्याची वेळ कशाला आली असती. त्याच ग्रुपवरून भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत हे ग्रुपवर असलेल्या आमदार वैभव नाईक यांना दिसले नाही का? आमदार वैभव नाईक यांच्यावर टीकेचा त्रास का व्हावा? पेट्रोल दरवाढ झाली म्हणून आपला पेट्रोलपंप सोडून राणेसाहेबांच्या पेट्रोलपंपावर बिनपैशाचा तमाशा करणारे वैभव नाईक आता कुठल्या बिळात लपलेत हे आम्ही शिवसेनेला जाहीरपणे विचारत आहोत. केंद्रसरकार पाठोपाठ इतर राज्यांनी आपापला कर कमी करत पेट्रोल स्वस्त करत जनतेला दिलासा दिला. पण महाराष्ट्रातील वसुली सरकार अजूनही वसुलीच्याच पाठीशी आहे. आता वैभव नाईक यांना सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलन करायची हिंमत का होत नाही? सत्तेचा गैरफायदा घेऊन भ्रष्टाचार आणि अपयश लपवण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग शिवसेनेने करू नये. भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर खोट्या तक्रारीवरून एकतर्फी पोलीस कारवाई झाल्यास भाजपा ती सहन करणार नाही. कोणाला जर युवासेना स्टाईल दाखवायची एवढीच खुमखुमी आली असेल तर केव्हाही वेळ आणि ठिकाण देऊन समोर या. तुमची सत्तेची मस्ती जिरवायला आम्ही समर्थ आहोत. त्यासाठी आम्हाला तुमच्यासारखी सत्ता आणि पोलिस संरक्षण लागत नाही, असा इशारा कुडाळ भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य युवा नेते आनंद शिरवलकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा