नेत्यांच्या बंगल्याची चर्चाच जास्त
सावंतवाडीचे नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा प्रवक्ते असलेले चर्चेतील नेतृत्व सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या नव्या वास्तूत प्रवेश केला. संजू परब यांनी आपल्या नव्या वास्तूला “जगदंब” नाव देऊन शिवाजी महाराजांप्रति असलेली आत्मीयता जपण्याचा प्रयत्न केला आहे. दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, उमेदीने साजरा करण्याचा दिव्यांचा उत्सव. दिव्यांच्या याच उत्सवाचे औचित्य साधत संजू परब यांनी लक्ष दिव्यांच्या साक्षीने नव्या वास्तूत प्रवेश करत येणाऱ्या वर्षात आपल्या राजकीय कारकिर्द देखील प्रकाशमय करण्याचे संकेत दिले आहेत. संजू परब यांनी नव्या वास्तूत प्रवेश करताना त्यांचे राजकीय मित्र तसेच काहीच दिवसांपूर्वी राजकीय आखाड्यात टीका करणारे विरोधी पक्षाचे नेते सुद्धा उपस्थित होते, यावरून राजकीय घोडेमैदान आणि वैयक्तिक संबंध यांचा दुरान्वये काही संबंध नसतो हेच दिसून आले. राजकीय कुरघोडीवरून रणांगण निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हे एक सर्वोत्तम उदाहरण होते.
कारण काहीही असो, नेते, लोकप्रतिनिधी आदींनी काहीही केले तरी त्याला प्रसिद्धी ही मिळतेच. काही त्यांचं कौतुक करतात तर काही टीकात्मक विशेषणे लावतात. परंतु घर म्हणून आपली वास्तू उभारताना नेता असो वा अभिनेता प्रत्येकजण जीव ओतून ती उभारतो. मग तो संजू परब यांचा जगदंब बंगला असो वा नारायण राणेंचा अधिश, उद्धव ठाकरेंचा मातोश्री वा राज ठाकरेंचा शिवतीर्थ. प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं, एक वेगळी ओळख असते. आणि अशीच ओळख जपण्यासाठी संजू परब यांनी दिवाळी पाडव्याच्या दिवशी नव्या वास्तूत प्रवेश करत आठवण चिरंतर राहील याची काळजी घेतली आहे. योगायोग म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणातील चर्चेतील नाव म्हणजे संजू परब आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेतील नाव राज ठाकरे यांनी कृष्णकुंज वरून शिवतीर्थ या शिवमय नाव असलेल्या नव्या वास्तूत प्रवेश करत मनसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वलयाच्या आणखी जवळ येत असल्याचे सूचित केले आहे.
राजकीय स्वार्थासाठी अनेकांकडून थोर विभूतींचे फोटो नाव यांचा सर्रास वापर केला जातो, परंतु अनेकदा राजकारण करताना मात्र सोयीस्कर त्या थोर व्यक्तींच्या कार्याचा, त्यांच्या शिकवणीचा विसर पडतो. त्यामुळे आपली मंनत पूर्ण करताना शाहरुख होण्यापेक्षा राजकारणात ज्या आदरणीय नावांचा वापर होतो त्यांचा आदर्श जपला गेला पाहिजे.