You are currently viewing नौदल दिन कार्यक्रमाची व्यापाऱ्यांना माहिती द्यावी – उमेश नेरूरकर

नौदल दिन कार्यक्रमाची व्यापाऱ्यांना माहिती द्यावी – उमेश नेरूरकर

मालवण:

 

यंदाचा नौदल दिन येथील किल्ले सिंधुदुर्ग येथे साजरा होत असून यासाठी राष्ट्रपती व पंतप्रधान या दोन्ही अतिमहनीय व्यक्तींचे आगमन मालवण शहरात होणार आहे. नौदल दिनाचा कार्यक्रम मालवण तालुक्यात साजरा होणे ही केवळ व्यापारी बांधवांच्याच नव्हे, तर समस्त सिंधुदुर्गवासीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद व स्वागतार्ह बाब आहे. या उपक्रमाचे मालवण व्यापारी संघ स्वागत करत आहे. मात्र, नियोजित नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळी मालवण परिसरातील व्यवहार-व्यवसाय बंद ठेवावे लागणार किंवा कसे, याबाबत माहिती द्यावी, अशा मागणीचे पत्र मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी तहसीलदार वर्षा झालटे यांना दिले आहे.

नौदल दिनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधान व अन्य सर्व अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने मालवण शहर व परिसरातील सर्व दैनंदिन व्यवहार व व्यवसाय आठवडाभर बंद ठेवावे लागणार असल्याची अफवावजा चर्चा होत असल्याचे कानावर येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने असे व्यवहार- व्यवसाय बंद ठेवणे अनिवार्य असल्यास त्याला आमची ना नाही. मात्र, त्याबाबतची पूर्वसूचना या नियोजीत कार्यक्रमापूर्वी एक महिना आधी सर्वांना मिळाल्यास त्या दृष्टीने नियोजन करणे सोयीचे ठरेल. नोव्हेंबर, डिसेंबर महिने हे पर्यटन हंगामाच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या आगाऊ आरक्षणादी कामी अशी पूर्वसूचना मिळणे अत्यावश्यक आहे, त्यामुळे नौदल दिन कार्यक्रमाची माहिती देण्यात यावी, असे उमेश नेरुरकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा