You are currently viewing “मत्स्यगंधा समर्थ थिएटर” मुळे देवबागमध्ये मनोरंजनाचे नवीन दालन खुले

“मत्स्यगंधा समर्थ थिएटर” मुळे देवबागमध्ये मनोरंजनाचे नवीन दालन खुले

युनियन बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक कृष्णकांत सातोसे यांचे प्रतिपादन

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवबाग गावात पी अँड पी समूह प्रा. लिमिटेड यांच्या वतीने आणि देवबाग ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मत्स्यगंधा समर्थ थिएटरची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे देवबागमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकां बरोबरच स्थानिकांना मनोरंजनाचे एक दालन खुले झाले आहे, असे प्रतिपादन युनियन बँक ऑफ इंडिया, कणकवलीचे शाखा व्यवस्थापक कृष्णकांत सातोसे यांनी देवबाग (ता. मालवण) येथे बोलताना केले.

देवबाग येथे मत्स्यगंधा समर्थ थिएटरचे उद्घाटन दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सरपंच सौ. जान्हवी खोबरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पी अँड पी समूहाच्या संचालक प्रणाली उपरकर, माजी आमदार परशुराम उपरकर, मालवण शाखा व्यवस्थापक रामगोपाल यादव, व्यवस्थापक हेमंत कुबल, हेमंत उपरकर यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरपंच जान्हवी खोबरेकर यांनी मत्स्यगंधा समर्थ थिएटर मुळे देवबागच्या सांस्कृतिक ठेव्यात नव्याने भर पडल्याचे सांगितले तर हेमंत कुबल यांनी आभार मानले.

मत्स्यगंधा समर्थ थिएटर मध्ये हिंदी मराठी चित्रपटांबरोबरच कोकणातील लोककला सादर केल्या जाणार आहेत. तसेच विविध कार्यक्रम, बैठकांसाठी हा हॉल उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती पी अँड पी समूह यांच्या वतीने देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा