You are currently viewing भाऊ आठवतो मला …

भाऊ आठवतो मला …

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

अरे अरे रानवारा …
जा रे माझ्या माहेराला …
आली आली भाऊबीज ..भाऊ आठवतो मला ..
अरे अरे रानवारा ….

रोज खेळलो एकत्र.. धाब्यावरती चढलो
मातीतील शेंगदाणे तेथे वेचित बसलो
ओट्यावरती फटाके सांडशीत आपटले
चटक चटक टिकल्या अंगणातला पसारा …
अरे अरे रानवारा….

गेलो शेतात संगती.. बोंडे कपाशी वेचली
झाडाखाली बसून ती चून भाकरी ही खाल्ली
झोका झाडाला बांधला डाळ बट्टया बनवल्या
होला झाडावर बोले मनी होई गलबला …
अरे अरे रानवारा …

आठवता सारे क्षण आता ओलावे पापणी
प्रत्येकीच्या माहेराची आहे अशीच कहाणी
एक एक येता याद मन होई पाणी पाणी
राहो माहेर सुखात देवा हीच विनवणी ….
अरे अरे रानवारा …

माहेर ते माहेरच त्याला कशाची ना सर
नाती बाकीची असती पहा वर वर वर
पाय ठेवता कधी ही कसे हासतात डोळे
मला माहेराचे पहा पडे नेहमीच कोडे …
अरे अरे … रानवारा ….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा