जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना
दिवाळी पाडवा आज त्याची किती किती गोडी
नवऱ्याला ओवाळता वाटते हो शुभघडी
जन्मत: बांधल्या गाठी स्वर्गामध्ये म्हणतात
सात जन्म सोबतीस असे सारे म्हणतात …
ओवाळता सोबत्यास डोळ्यामध्ये दिसे हसू
काय पाहजे ते माग नको आज राणी रूसू
सर्व मिळाले म्हणते संसारात आहे खुश
सुखदु:ख्ख वाटतोच पुसतोस माझे आसू …
भरला संसार राहो मागणे हे देवा तुला
हेलकावे झोका बघ झुलतोय बघ झुला
चढ उतार असती चालायचे म्हणावे हो
ऊन पावसाचा खेळ सांगा कोणाला चुकला …
समाधान मनी असो उगा करू नये क्रोध
ओठांवर असावे हो सदा नेहमीच मध
शांत असतात मने सुखे भरभरून येती
भोग चुकले कोणाला सांगा कुणाला नियती …
नवरा आहे सुकाणू वल्हवून पार नेतो
तप्त झळा उन्हाच्या तो माथ्यावरती झेलतो
सारथी घराचा सुखी सुखी सारे घरदार
बारा महिने चालतो संसाराचा हा व्यापार …
औक्ष मागते मी देवा आयुरारोग्य मागते
सुखी ठेव धनी माझा हर घडीला सांगते
मिळाले हो सारे सुख तृप्त तृप्त आहे मन
औक्षण करणे माझे आहे सुखाचीच धुन ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि :५ ॲाक्टोबर २०२१
वेळ : दुपारी : १:२९