You are currently viewing जैन धर्मीयांची दिवाळी
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जैन धर्मीयांची दिवाळी

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या चेन्नई स्थित ज्येष्ठ लेखिका सौ.भारती महाजन-रायबागकर यांचा जैन धर्मियांची दिवाळी विषयावरील लेख

नवरात्र सरतं…दसऱ्याचं सोनं लुटून होतं आणि ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी’ असं नाचत-गात वासुदेव दिवाळी आल्याची वर्दी देत, सर्वांच्या खुशालीचे मागणं मागत खेडोपाडी फिरत असतो. शहरातील रस्ते ओसंडुन वाहत असतात. कपड्यांच्या, दागिन्यांच्या, फर्निचरच्या, मिठाईच्या दुकानात गर्दी मावत नाही. दिवाळी पूर्वीचा हा माहोल आपण नेहमीच अनुभवत असतो. तशीही आपल्याकडे सणांची एवढी रेलचेल आहे की वर्षभर आपण त्या उत्सवी वातावरणातच रमत असतो. मधली रिकामी जागा वेगळेवेगळे ‘डेज्’ भरून काढतातच. पण या सगळ्या सणांचे फक्त त्या त्या दिवसापुरतंच वैशिष्ट्य आहे. गुढीपाडव्याला गुढीचं, दसऱ्याला आपट्याच्या पानांचं, पोळ्याला बैलांचं. पण पाच-सहा विशिष्ट दिवसांच्या एकत्रीकरणाच्या दिवाळीची बातच न्यारी. दिवाळी हा सण सर्वसमावेशक आहे. त्यात विविध मानवी नात्यांची सांगड तर घातलीच आहे पण रीतीभाती, परंपरा, ऋतुमान यांचाही विचार केलेला आढळतो.

इतर धर्मांप्रमाणे जैनधर्मीयही दिवाळी साजरी करतात. पण जैन धर्मातील दिवाळीची संकल्पना थोडीशी वेगळी आहे. इतर धर्मांमध्ये जसा पौराणिक कथांचा आधार आहे, तसाच जैन पुराणात देखील याचा उल्लेख आहे. सुमारे सव्वीसशे वर्षांपूर्वी चोवीसावे जैन तीर्थंकर महावीर यांचे अश्विन महिन्यातील अमावस्येच्या पहाटे चार वाजता बिहार राज्यातील पावापुरी येथे निर्वाण झाले. निर्वाण म्हणजे मोक्ष आणि मोक्ष म्हणजे जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका…जैन धर्मात स्वर्ग सुखाच्या प्राप्तीपेक्षाही दुर्लभ असा मोक्ष मिळवण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.भगवान महावीर हे चोविसावे आणि शेवटचे तीर्थंकर होते. त्यांनी मोक्ष मिळवला, त्या आनंदाप्रीत्यर्थ पहाटेच्या अंधारात असंख्य दिवे उजळुन दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरु झाली. याला निर्वाण महोत्सव असेही म्हणतात.

या दिवशी सर्व जैनधर्मीय पहाटे चार वाजता जैन मंदिरात जाऊन निर्वाण लाडु चढवतात. बदलत्या परिस्थितीनुसार आणि सोयीनुसार ही वेळ थोडी थोडी पुढे सरकत गेली आहे. याचा आकार जुन्या काळातील पायलीप्रमाणे मोठा असतो. त्यावर आणखी एक छोटा लाडू ठेवतात. काही ठिकाणी तो बुंदीचा किंवा तिळाचा बनवतात. एका ताटात हा लाडु, साळीच्या लाह्या, आवळे ठेवतात आणि महावीरांच्या आधीचे 23 तिर्थंकर आणि कोट्यावधी साधुंपैकी कांही प्रमुख साधुंच्या निर्वाणस्थळांचा उल्लेख असलेले ‘निर्वाणकांड’ हे स्तुति-स्तोत्र म्हणून जय जयकार करत लाडु चढवला जातो. समाजाच्या वतीने मुख्य लाडु चढवला जात असतांना प्रत्येक जण आपल्या हातातील एका ताटलीत एक छोटा लाडु घेऊन चढवत असतो. अलीकडे काही उत्साही लोकांनी या वेळेस फटाके वाजवण्यास सुरुवात केली होती. जैन धर्म अहिंसेचा पुरस्कर्ता आहे. त्यामुळे समाजातील विद्वानांनी फटाके वाजवु नयेत असे प्रबोधन केले आणि फटाक्यांनी एकूणच पर्यावरणाची किती हानी होते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे जीवहिंसा टळुन आपोआपच पर्यावरण रक्षणालाही हातभार लागला. आता बरेचजण मंदिराच्या परिसरात तर नाहीच, पण घरीही फटाके वाजवत नाहीत.

बहुतांशी जैन समाज हा सर्व भारतभर स्थिरावलेला असला तरी त्यातील कांही समाजबांधव राजस्थान आणि उत्तरेकडचे रहिवासी होते. दुष्काळ, युद्धजन्य परिस्थिती, उपजीविका आदींमुळे काही पिढ्यांपूर्वी ते महाराष्ट्र, कर्नाटक इ. राज्यात स्थिरावले. इतर धर्मांप्रमाणेप या धर्मातही दिगंबर/श्वेतांबर हे दोन मुख्य पंथ असुन दिगंबर पंथात बघेरवाल, खंडेलवाल, सैतवाल अशा अनेक जाती, पोटजाती, उपजाती आहेत. इकडे आल्यानंतर त्यातल्या कांहींनी इथल्या भाषा-वेशभुषां सोबत आपली भाषा, वेश तसेच टिकवुन ठेवले. कांहीजण मात्र इथल्या मातीशी एवढे एकरूप झाले की ‘जसा देश, तसा वेश’ असं म्हणत त्यांनी घरादारात बोलण्यासाठी मराठी भाषा आत्मसात केलीच पण नऊवारी ते पाचवारी आणि आता पंजाबी ड्रेस ते मॉडर्न असा वेशही अंगीकारला आहे. राजस्थानात अजुनही तिथली परंपरा टिकवलेले समाज बांधव आहेत. म्हणुनच इथे राहणाऱ्यांनी स्वतःला जैन म्हटलं की ‘तुमची भाषा आणि वेश मराठी कसा’ हा प्रश्न हमखास विचारल्या जातो.

पण विषय आहे दिवाळी साजरी करण्याचा. तर जैन धर्मातील सर्वच पुरुष आणि बहुतेक स्त्रिया ही याच पद्धतीने पहाटे निर्वाण लाडु चढवतात. पण काही विशिष्ट पोटजातीतील…उदाहरणार्थ बघेरवाल स्त्रियांसाठी ‘दिवा देणे’ ही वेगळी प्रथा असते. हा मारवाडी भाषेतील ‘दिवो दिखानो’ या शब्दाचा अपभ्रंश असावा. ओल्या कुंकवाने स्वस्तिक आणि पद्म काढुन त्यावर रव्याच्या आठ पातळसर लहान पुऱ्या ठेवतात. त्यातील चार पुऱ्यांवर प्रथम गूळ घालुन केलेली जाडसर लहान दशमी ठेवतात. त्यावर सुतारफेणी (सुत्रफेणी) आणि त्यावर तिळाचे लाडु ठेवतात. उरलेल्या चार पुऱ्यांवर एखादे मोठे फळ, बहुतेक सीताफळ ठेवतात. याच्या चारही बाजुंना पाच विड्याची पाने ठेवुन त्यावर आवळे, तांदूळ, साळीच्या लाह्या, झेंडूची फुले इत्यादी ठेवतात. नंतर या सर्वांवर प्रत्येकी एकेक कणकेचा दिवा लावतात.

यातील आठ पुऱ्या आहेत अष्ट कर्माचे प्रतीक, सुत्रफेणी मध्ये बारीक, बारीक अशी अनेक सूत्रे असतात, म्हणून ते चौर्‍यांशी लक्ष योनी यांचे प्रतीक, तीळ एकदलीय अखंड धान्य आणि स्निग्धतेचे भांडार, फळ हे मोक्षरूपी फळाचे प्रतीक… असे हे सर्व पदार्थ प्रतिक रूपी आहेत.

आणि त्यावेळी ऋतू चक्राप्रमाणे नियमित येणारी धान्य, फुलं,फळांचा वापर करावा हा ही हेतू असावा. अर्थात काही ठिकाणी मतभिन्नते मुळे या प्रथेतील साहित्यात बरेचसे बदल होत आहेत.

जैन तत्वप्रणाली भोगांपेक्षा त्यागावर आधारित आहे. जैनधर्मीय देव हे राग-द्वेष विरहित, कुठल्याही इच्छा-आकांक्षा यांनी रहित असतात. दैनंदिन पुजेतील अष्टद्रव्य चढवतांना देखील इहलोकातील नश्वर वैभवापेक्षा आपल्याला त्यांच्या प्रमाणेच शाश्वत असे मोक्षपद मिळविण्यासाठी मुक्ती सोपानाच्या पायऱ्या क्रमाक्रमाने चढता याव्यात अशी प्रत्येक जैन श्रावकाची इच्छा असते.

भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी गौतम गणधरांना केवलज्ञान प्राप्त झाले म्हणुनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्ती रुपी लक्ष्मी मिळविण्यासाठी नव्हे तर मोक्ष रुपी लक्ष्मी किंवा आत्मकल्याण रुपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर म्हणजे तीर्थंकरांचे प्रमुख शिष्य. ते त्यांचा दिव्य ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात.

दिवाळीसाठी पूर्वी घरात मातीच्या जमिनीवर आणि आता फरशीवर राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या पिठाची रांगोळी काढतात त्याला ‘मांडणे’ असे म्हणतात. त्यावर पाट मांडुन लक्ष्मीपुजन किंवा ओवाळण्यादी विधी केले जातात. बदलत्या काळानुरूप जैन तत्त्वज्ञान आचरणात आणण्यासाठी कठीण आहे असे मानल्यामुळे आणि मनुष्य हा सामान्य प्राणी आहे. त्यामुळे व्यवहारात धनसंपत्तीचा लाभ व्हावा अशी अपेक्षा ठेवणारे जैनधर्मीय दिसले तर नवल वाटायला नको.

भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच. राजस्थान, उत्तरेकडे राखी पौर्णिमेला महत्त्व आहे. इकडे आलेल्या जैन समाजातील काहींनी तीच परंपरा कायम ठेवली. काहींनी मात्र इथल्या रीतिरिवाजाप्रमाणे रक्षाबंधना सोबतच भाऊबीज साजरी करण्यास सुरुवात केली. त्यातही वर उल्लेख केलेल्या विशिष्ट समाजात फक्त भावा कडुनच ओवाळणी वसूल केली जात नाही तर बहीणही भावाला आणि भाऊ विवाहित असेल तर वहिनीलाही भेटवस्तु देत असते. रिटर्न गिफ्ट म्हणता येईल याला.

थोडक्यात काय तर दैनंदिन जीवनात जरी इतर प्रांतातील रीतिरिवाज आणि खाद्यसंस्कृती कांहीशी आपलीशी केली तरी सण उत्सवाच्या वेळी आपलीच परंपरा जपण्याचा आणि खाद्यसंस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करणारा असा हा जैन समाज आणि अशी ही त्यांची दिवाळी.

*थोडी सारखी, थोडी वेगळी*

हो खरंच की….
दिवाळी आली आहे माझ्या घरी…खर्रंच…
तुमच्यासारखीच…

मलाही वेध लागतात नवरात्रीपासुन दिवाळीचे…तुमच्यासारखेच…

मीही काही मनांत…कांही जनांत… बेत ठरवते…तुमच्यासारखेच…

मीही सुरुवात करते घराच्या साफसफाई पासुन दिवाळीच्या तयारीची… तुमच्यासारखीच…

घर-दार लख्ख झाल्यावर समाधानाने ‘हुश्श’ म्हणत जरासं टेकण्याचा ‘फक्त’ विचार करते…तुमच्यासारखीच…

कारण तोपर्यंत अगदी उंबरठ्यावर आलेली असते दिवाळी…तुमच्यासारखीच…

आणि या सगळ्यांना समांतर असं चालुच असते कपड्यालत्त्यांची खरेदी…यादी बरहुकूम वाणसामान…नको नको म्हणत असतांना मुलांच्या हट्टाखातर फटाक्यांची खरेदी…आणि इतर बरंच कांही छोटमोठं… अगदी तुमच्यासारखंच…

मीही रंग भरते रेखलेल्या शुभ्र रांगोळीत कधी ठिपक्यांच्या…कधी फुला-पानांच्या… कधी प्रसंगानुरूप काढलेल्या चित्रांच्या… वाटेला आलेल्या अंगणाचा पैस पाहुन… अंथरूण पाहून पाय पसरावेत…तसे अंगण पाहुन रांगोळी काढावी या चालीवर… तुमच्यासारखीच…

मीही अंधार दूर सारते…विजेच्या दिव्यांच्या संगतीने…परंपरा म्हणुन तेलाचे दिवे पाजळुन…तुमच्यासारखीच…

आणि हे सगळं करताना घोकत असते सतत… *दिवाळी आली, दिवाळी आली…मोती साबणाची…अं हं…कामं उरकण्याची वेळ आली…* तुमच्यासारखीच…

आता तुम्ही म्हणाल हे तुमच्यासारखं, तुमच्यासारखंच काय लावलंय…सगळंच आमच्यासारखं तर मग…तुमचं विशेष काय?

तर…फराळाची पूर्वतयारी म्हणून तांदुळ भिजत घालते आधी… तुमच्यासारखेच…पण अनारशासाठी…? अं…हं…वर उल्लेख केलेल्या फेण्या आणि करंज्या, सांजोऱ्या यांसाठी…तांदुळाच्या पिठाचा साठा लावून हे सर्व पदार्थ केले जातात. फेण्या हे तर अतिशय कौशल्याचे काम…’जमलं तर सुत नाहीतर… पण त्याविषयी पुन्हा कधीतरी…

लाडवांसाठीही पिठीसाखर नाही तर बुऱ्याची साखर लागते…

करंजीचे सारण तिळकूट आणि बुऱ्याची साखर यांचे मिश्रण असते…

सांजोरीत मात्र पिठीसाखर आणि विलायची यांच सारण…

करंज्या आणि सांजोऱ्या ह्या फक्त रव्याच्याच असतात

लाडु बहुधा मैदा म्हणजे पिठीचे असतात.
पूर्वी ह्या सगळ्या पदार्थांसाठी रवा घरीच काढल्या जायचा, त्यामुळे मैदा भरपुर राहायचा. शिवाय इतर सर्व वातुळ पदार्थांसोबत समतोल साधावा म्हणूनही असेल कदाचित…

आणि हो…हे सर्व करतांना सामाजिक भान जपल्या जाईल याचीही काळजी घेतेय…अगदी तुमच्यासारखीच…!

बाकी सर्व…थोडी तुमच्यासारखी…थोडी वेगळी…
आली माझ्या घरी आनंद, उत्साह, आरोग्य घेऊन ही दिवाळी…!

सौ. भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334
३-१०-२१.

प्रतिक्रिया व्यक्त करा