जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रो.डॉ.प्रवीण उर्फ जी.आर. जोशी यांची काव्यरचना
दीप घेऊनी आली
ती रात सजवुनी गेली
ती आवस शरदाची
नक्षत्र लेऊनी आली
तम सर्वही सारूनी
चांदणे पिऊन गेली
रात सजवुनी गेली
ती दीप लावूनी आली
निळ्या आकाशी त्या
आकाश दीप सजला
नक्षत्र माळांतही
शुक्रतारा चमकला
मुग्ध चांदणी एक
मनात हसुन गेली
ती रात सजवुनी गेली
कार्तिकी मासही हा
पणत्या तेवत होत्या
मंद धुंद उजळीत
स्नेह पेरीत होत्या
वात अचानक का
काजळी धरत गेली
दीप घेऊनी आली
ती रात सजवुनी गेली
थंडीची चाहुल ही
रात किड्यांना होती
त्रिपुरारी पुनवेला ही
सहस्त्र वाती भिजती
ते दीप नदीकाठी ही
सहज तरंगत होती
दीप घेऊनी हाती
दीपावली सजवुनी गेली
प्रो डॉ जी आर (प्रविण )जोशी
अंकली बेळगांव
कॉपी राईट
मनपूर्वक आभार