बांदा
बांदा शहरातील विधवा, निराधार महिलांना १४ व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून अशा पद्धतीने अर्थसहाय्य करणारी बांदा ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. याचा लाभ शहरातील शेकडो महिलांना मिळणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती सरपंच अक्रम खान यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सरपंच अक्रम खान म्हणाले, शहरातील कोणत्याही वयोगटातील विधवा महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. बांदा ग्रामपंचायतीने आतापर्यंत विविध लोकोपयोगी योजना राबविल्या आहेत. शहरातील विधवा व निराधार महिलांना एकरकमी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आम्ही घेतला. यासाठी १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातुन निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलांनी विहित नमुन्यात ग्रामपंचायत कार्यालयात २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावा. यासोबत बँक पासबुक, आधारकार्ड, रेशनकार्ड व पतीचा मृत्यू दाखला सोबत जोडणे आवश्यक आहे. केशरी व पिवळे शिधापत्रिका धारकांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे. यावेळी उपसरपंच हर्षद कामत, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, रिया आल्मेडा, किशोरी बांदेकर, ग्रामविस्तार अधिकारी प्रसाद ठाकूर आदी उपस्थित होते.