मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. ही नोटीस, गेल्या निवडणुकांत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांसंदर्भात आहे. यासंदर्भात मंगळवारी शरद पवार यांना विचारले असता, ‘आपल्यावर प्रेम असल्याने आनंद आहे. पहिल्यांदाच मला नोटीस आली, सुप्रिया यांना येणार असल्याचे समजते. चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा आनंद आहे’, असे पवार म्हणाले.
‘मला सोमवारी नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवले आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून ही नोटीस आली आहे. त्याचे उत्तर आपण लवकरच देऊ. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांसंदर्भात ही नोटीस आहे,’ असेही शरद पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सध्या भाजपा आणि राज्य सरकार यांच्यात तणावाचे वातावरण आहे. अशातच आयकर विभागाचे नोटीस प्रकरण समोर आले आहे. आयकर विभागाकडून या नोटिशीत निवडणूक काळात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांची माहिती मागवली आहे.