You are currently viewing कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरणाबाबत सर्वपक्षीय बैठक घेणार : नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरणाबाबत सर्वपक्षीय बैठक घेणार : नगराध्यक्ष समीर नलावडे

राजकीय पक्षांच्या नेत्यांना नगराध्यक्ष करणार निमंत्रित

कणकवली

मागील अनेक वर्षे स्थलांतरणाच्या मुद्द्यावरून निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाबाबत निर्णायक बैठक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० कणकवली नगरपंचायत येथे घेण्यात येणार आहे. या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक यांच्यासह कणकवलीतील सर्व माजी आमदार आणि कणकवली शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक तसेच लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या सोबत मराठा समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण देण्यात येणार आहे, अशी माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

मागील तीन वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा स्थलांतरण मुद्दा प्रलंबित राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम महाराष्ट्रवासीयांचे आराध्य दैवत असून त्यांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाबाबत सर्वानुमते एकमुखी निर्णय व्हावा आणि सर्वानुमते ठरलेल्या जागेवर पुतळ्याचे स्थलांतरण होत हा प्रश्न मार्गी निघावा याकरिता पुढाकार घेत ही बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती नलावडे यांनी दिली. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात या पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने सद्यस्थितीत महामार्गाच्या सर्विस रस्त्यावरच असलेल्या पुतळ्याचे योग्य जागी स्थलांतर करण्याची गरज आहे. याबाबत आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही बैठक घेण्यात येत असून या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा