You are currently viewing किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी ५० लाखाचा निधी मिळणार

किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी ५० लाखाचा निधी मिळणार

जिल्हा नियोजनमधून देणार निधी आ वैभव नाईक यांची माहिती

मालवण

मालवण येथील नव्या प्रशस्त जेटीचे काम पूर्णत्वास आले आहे. मुख्यमंत्र्यांकडे बंदर जेटी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी केली असून त्याला तत्वतः मान्यता मिळाली आहे. जिल्हा नियोजनमधून या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला जाणार आहे. पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत या जेटीचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी आज येथे दिली. मालवण दौर्‍यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी येथील बंदर जेटी परिसरात नव्याने बांधलेल्या प्रशस्त जेटीची पाहणी केली.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, जोगी, गणेश कुडाळकर, पंकज सादये, किसन मांजरेकर, अन्वय प्रभू, सन्मेश परब, मंगेश सावंत, मेरीटाईम बोर्डाचे अभियंता श्री. पेटकर, श्री. गायकवाड, बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, साहेबराव कदम यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार नाईक म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली येथील पूर्वीची जेटी ही जुनाट बनल्याने याठिकाणी नवीन जेटी बांधण्यात यावी अशी मागणी किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटना, नगराध्यक्षांसह शिवप्रेमींनी केली होती. त्यानुसार चार वर्षापूर्वी याठिकाणी नवीन सुसज्ज जेटीच्या बांधकामास मंजुरी मिळाली. सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून सुसज्ज अशी जेटीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याठिकाणी सनशेड आणि कंपाउंडचे काम शिल्लक असून या कामासाठी अडीच ते तीन कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे त्यामुळे हे कामही लवकरच मार्गी लावले जाईल.

याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनमधून वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणून ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला जाणार आहे. किल्ला येथेही नवीन जेटी प्रस्तावित करण्यात आली आहे. कारण याठिकाणी ओहोटीच्यावेळी नौका लावताना समस्या भेडसावते. नव्या जेटीमुळे येथील पर्यटन वाढीस वेगळे स्वरूप प्राप्त होईल. वाढत्या नौकांमुळे त्या उभ्या करून ठेवण्यात अनेक अडचणी भासत असल्याने नव्या नौकांना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी मेरीटाईम बोर्डाकडे करण्यात आली आहे. मोठ्या नौकांसाठी टर्मिनल उभारणीचा ५० टक्के राज्य शासन व ५० टक्के केंद्र शासन असा शंभर कोटीचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास मोठ्या प्रवासी नौकांना या टर्मिनला फायदा होईल. यादृष्टीने आपला पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 6 =