You are currently viewing करुळ घाटात लक्झरी चालकाला बेदम मारहाण; गाडीचीही तोडफोड….

करुळ घाटात लक्झरी चालकाला बेदम मारहाण; गाडीचीही तोडफोड….

वैभववाडी

ट्रकला हूलकावणी दिल्याच्या रागातून घाटात गगनबावडा व करुळ च्या हद्दीवर लक्झरी चालकाला बेदम मारहाण करत लक्झरीवर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. हा प्रकार गुरुवारी रात्री १२ वा. च्या सुमारास घडला. सुदैवाने लक्झरीमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. अखेर प्रकरण गगनबावडा पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी संतप्त नागरिकांना शांत करत प्रकरण समझोत्याने मिटवले.
गुरुवारी रात्री १०.३० वा. च्या दरम्यान करुळ जामदारवाडी नजीक लक्झरी चालकाने ट्रकला हूल दिली. यात ट्रक चा आरसा फुटला. नुकसान झालेल्या आरशाची रक्कम ३००रु. दे अशी मागणी ट्रक चालकाने केली. लक्झरी चालक दीडशे रुपये देत होता. परंतु ट्रकचालकाने घेतले नाहीत. त्यानंतर लक्झरी चालकाने पाचशेची नोट ट्रक चालकाच्या तोंडावर फेकली. त्याचा राग आल्याने ट्रक चालकाने लक्झरी चालकाची कॉलर पकडली. लक्झरी चालकाने त्याच्या कानाखाली चढवली.

दरम्यान दोन्ही गाड्या करूळ चेक पोस्टवरून मार्गस्थ झाल्या. ट्रक चालक हा गगनबावडा येथील असल्याने त्यांनी घडलेला प्रकार स्थानिक ग्रामस्थांना सांगितला. ग्रामस्थ तात्काळ घाटात गगनबावडा हद्दीत जमा झाले. करुळ घाटातून लक्झरी येताच त्या ग्रामस्थांनी रस्त्यात ट्रक आडवा लावला. लक्झरी चालकाला गाडीतून खाली खेचत बेदम मारहाण केली. गाडीच्या काचा फोडल्या. सुदैवाने यात प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. रात्री प्रकरण गगनबावडा पोलीस ठाण्यात पोहोचले. अखेर समझोत्याने प्रकरण पोलिसांनी मिटविले.

प्रतिक्रिया व्यक्त करा