जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक, कवी, गझलाकार श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना
एक पणती तुमच्या दारीं एक माझ्या दारीं
स्मृती जागवित अंतरातली आली दिवाळी, आली दिवाळी
कोण कोठले कधी भेटलो, अलगद हृदयाशीच बिलगलो
ठाऊक नव्हता रस्ता तरीही चार पावले साथ चाललो
त्या वाटेवर अजून असतील आठवणींची शिते सांडली
स्मृती जागवीत……
किती धावलो उन्हात तरीही नव्हती वाटत खंत कशाची
होती सोबत गूढ सावली या हातांना त्या हाताची
ज्योत मांडते कथा मैत्रीची जाणू ओवी ही जात्यावरली
स्मृती जागवीत…..
वसंत येई प्रीत पाऊली सुख स्वप्नांच्या देत चाहुली
आयुष्याला फुटे पालवी तना मनाची वेल बहरली
ज्योत पाहता अजून प्रीतीची गझल ओघळे गाली
स्मृती जागवीत……
ऋतू बहरले क्षणा क्षणांचे सोने बनले कणा कणांचे
काय हवे मग अजून आता असे उजळले भाग्य कुणाचे
या ज्योतीच्या चैतन्यातच ब्रह्म प्रकटले भाळीं
स्मृती जागवीत…..
एक पणती तुमच्या द्वारीं एक माझिया द्वारी
स्मृती जागवीत अंतरातली आली दिवाळी, आली दिवाळी
अरविंद