कुडाळ
निसर्गाशी हक्काचं नातं सांगणारी आणि पर्यावरणाशी नाळ जुळलेली आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जैवविविधेतील घटकांसाठी काम करणारी संस्था म्हणजे कोकण वाइल्डलाइफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग. सर्प विषयक काम करताना अल्पावधीतच कोकण वाईल्ड लाईफ ने कासव, कुत्रे, कोल्हे, मगरी, माकड अशा जनावरांसाठी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. कोणत्याही परिस्थितीत हाक मारली की प्राणी संवर्धनासाठी उभी राहणारी हक्काची संघटना म्हणून कोकण वाईल्ड लाइफ ची ओळख झालेली आहे. अशा या संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन दिनांक २८ ऑक्टोबर २१ रोजी बॅरिस्टर नाथ पै महाविद्यालय एमआयडीसी कुडाळ येथे सकाळी १०.३० वा. तरुण भारत, सिंधुदुर्ग चे आवृत्तीप्रमुख जेष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे हस्ते केलं जाणार असून विशेष अतिथी म्हणून एस. डी. नारणवर (उप वन संरक्षक सिंधुदुर्ग), आनंद (भाई )सावंत (प्राणी मित्र तथा अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा), डॉ. संतोष वाळवेकर (कं) (पशुवैद्यकीय अधिकारी), डॉ.प्रसाद देवधर (अध्यक्ष, भगिरथ प्रतिष्ठान), धीरेंद्र होळेकर (अध्यक्ष, वाइल्ड कोकण) तर विशेष उपस्थिती म्हणून प्रा.नागेश दप्तरदार (मानद वन्यजीव रक्षक), महादेव (काका) भिसे (मानद वन्यजीव रक्षक), अमृत शिंदे (वनक्षेत्रपाल, कुडाळ), डॉ.योगेश कोळी (वन्यजीव अभ्यासक), डॉ. नितीन पावसकर (बी.व्ही.एस. सी.) हे उपस्थित राहणार असून सुभाष पुराणिक (सामाजिक वनीकरण उप वन संरक्षक, सिंधुदुर्ग) हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
संस्थेच्या द्वितीय वर्धापनदिनाचे औचित्याने जिल्ह्यातील प्राणी मित्रांचा विशेष सन्मान केला जाणार असून यावेळी संस्थेच्या टी-शर्टचे अनावरण आणि वाटप, नियुक्तीपत्र प्रदान करणे अशा विविध उपक्रमांनी कोकण वाईल्ड लाईफ चा वर्धापन दिन साजरा होणार आहे, तरी या विशेष कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील प्राणीमित्रांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अनिल गावडे यांनी केलं आहे.