मालवण :
क्यार वादळात नुकसान झालेल्या मच्छीमारांना राज्य सरकारकडून जाहीर झालेल्या सानुग्रह अनुदानापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रापण व्यावसायिक वंचित राहिले होते. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाकडे पाठपुरावा करून मदतीपासून वंचित राहिलेल्या रापण व्यवसायिकांना अनुदानाची रक्कम मिळवून दिल्याबद्दल भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांची रापण व्यावसायिकांनी भेट घेत आभार मानले.
क्यार वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील रापण व्यवसायात असलेल्या मच्छिमार कुटूंबाचे नुकसान झाले होते. राज्य सरकार कडून या संदर्भात सानुग्रह अनुदान मंजूर झाले होते. पण सदर रक्कम उपलब्ध नसल्याने रापण संघातील व्यक्ती अनुदानापासून वंचित राहिले होते. सदर विषयी माजी खासदार निलेश राणे यांचे भाजपचे जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांच्या माध्यमातुन रापण व्यावसायिकांनी लक्ष वेधले होते.
त्यावेळी सदर व्यावसायिकांच्या प्रतिनिधींना घेऊन निलेश राणे यांनी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालय मालवण येथे धडक देऊन सदर रापण संघातील व्यक्तीचे पैसे देण्यासंदर्भात आयुक्त मत्स्यव्यवसाय यांना फेर पत्रव्यव्हार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर मच्छिमार कुटूंबातील व्यक्तीस लवकरात लवकर पैसे देण्यात यावेत असे सूचित केले होते. या पाठपुराव्यास यश येऊन तारकर्ली देवबाग येथील ८५० कुटूंबाना प्रत्येकी १०००० रुपये एवढे सानुग्रह अनुदान प्राप्त झाले आहे. त्याबद्दल स्थानिक १६ रापण संघातील प्रमुखांनी निलेश राणे यांच्या नीलरत्न या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
मच्छिमार समाजाला वेळोवेळी न्याय द्यायचे काम राणे परिवाराने केले असून या कठीण प्रसंगात आपण आमच्यासाठी उभे राहिलात असे रापण व्यावसायिकांनी राणे यांचे आभार मानले. यावेळी बाबा मोंडकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा परब, अवि सामंत, महेश मांजरेकर, विजय केवडेकर, नादार तुळसकर, गुंडू कांदळगावकर, मानवेल शिवलकर, बँत्याव लुद्रिक, विलास बिलये व १६ रापण संघातील प्रतिनिधी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.