कोरोना लॉकडाऊन उठवला म्हणजे मग लोकांकडे पैसे यायला सुरुवात होणार असे सरकारला वाटले असेल तर त्यात वावगे काहीच नाही. पण सरकारचे उद्योग वेगळे आणि जनतेचे उद्योगधंदे वेगळे याची जाणीव कदाचित संबंधितांना नसावी असेच वाटते.
लॉकडाऊनमध्ये लोकांना काम धंदे सोडून घरी बसवण्यासाठी सगळेच फेसबुके रात्रंदिवस एक करत होते. पोटापाण्यासाठी कोणी रस्त्यावर आलाच तर सरकारचे पोलीस दंडुक्याने त्याचा पार्श्वभाग शेकून काढत होते. लोकांचे धंदे पार बसले, बेरोजगारी वाढली, कोरोनामुळे कित्येक जवळची माणसे गमवावी लागली आणि कुटुंबाची घडी विस्कटली. आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आणि कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी घरातील सोनेनाणे गहाण घेऊन, विकून त्यांचे जीव वाचवावे लागले.
या सगळ्यातून बाहेर पडताच सामान्य माणसासमोर मायबाप काय वाढून ठेवलं? बँकांच्या हप्त्यांची वसुलीची आणि जप्तीची टांगती तलवार, टॅक्सचे पिंजरे आणि प्रचंड आलेल्या लाईट बिलाची वसुली करण्यासाठी वीजवितरणच्या तोडणी कामगार टोळ्यांची फौज! कंत्राटी कामगारांना प्रत्येकी पंचवीस जणांची यादी काढून द्यायची, काम हेच की बिल भरून घे नाहीतर तोड जोडणी! त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आला तेव्हा उर्मटपणाची हद्द झाली आणि जनतेत असंतोष पसरला.
सरकारच्या वसुलीत विरोधी पक्षांचा पण वाटा असावा की काय अशा पद्धतीने विरोधी राजकीय पक्षांची भूमिका मवाळ झाली. मनसे आणि भाजप हे विरोधी राजकीय पक्ष, पण जनतेसाठी खऱ्या अर्थाने दोन्ही पक्ष कधीच रस्त्यावर उतरले नाही. बैलांच्या झुंजीत हल्ली बैलही शहाणे झालेत, तसे हे राजकीय पक्ष जनतेच्या तोंडाला पाने पुसणारी आंदोलने करत वीजवितरणच्या सायबाच्या शिंगाला फक्त शिंग लावत केबिनमध्ये चहा पिऊन बाहेर येऊ लागले. सायबाची हिंमत वाढली आणि मग याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याही घरची लाईट बिनदिक्कतपणे कापली जाऊ लागली. वीज वितरणचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांच्याबद्दल काय बोलायचं? अहो साखरेचं पोतंच! तोंड उघडून समोर गोड आश्वासनं द्यायची आणि पाठीमागुन जनतेवर मीटर तोडणीचा खंजीर सपासप खुपसायचा! नाहीतर कणकवलीत वसुली करू न शकलेल्या सहृदय अभियंत्यावर कारवाईची वेळच का यावी? नोकरीच्या भीतीने बापडे लोकांच्या घरात अंधार पसरवू लागले आहेत. त्यातच कुडाळ शहर कार्यालयात पूर्वी पुरुष अभियंता असताना संतप्त जनता जवळपास रोजच पूजा घालायची. मंत्रोच्चार आणि षोडशोपचार असायचेच. आता तिथे महिला अधिकारी वसुलीला आणून बसवली आहे. त्यामुळे सहन होत नाही आणि योग्य शब्दात काय ते बोलताही येत नाही अशी सभ्य आणि सुसंस्कृत लोकांची गोची होऊन बसली आहे.
काल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वीजवितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. काँग्रेस हा राज्यातील सत्ताधारी पक्ष म्हणजे त्यांचे तरी ऐकले जाईल अशी जनतेची अपेक्षा असणारच. भाऊबीजेपर्यंत कोणाचीही वीज कापली जाणार नाही असे आश्वासन वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिले आहे असे कळते. त्यांनीही या आश्वासनाला जाहीर प्रसिद्धी देत जनतेला धीर दिला आहे.
पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या चतुर्थीत वीज कापली जाणार नाही या शब्दालाही वीज वितरणने वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या, ही खरी स्थिती आहे. त्यामुळे जनतेला दिलेल्या शब्दात काँग्रेसची जबाबदारी वाढली आहे. काँग्रेसचे आक्रमक नेतृत्व अभय शिरसाट यांनी तर यापुढे एकाचीही वीज कापली गेल्यास वीज अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.
काँग्रेस म्हणून अभय शिरसाट हे पाऊल खरोखरच उचलणार असतील तर मी त्यांचे जाहीर अभिनंदन करतो. राजकीय पक्ष म्हणून जनतेसाठी देर आये फिर भी दुरुस्त आये असेच म्हणावे लागेल. कारण आतापर्यंत सामान्य जनतेची क्रूर लांडगेतोड झालेली असून लोकांनी सावकारी व्याजाने खाजगी कर्जे उचलूनही ती बिले भरली आहेत. त्यामुळे पुढे त्यातून उदभवणारे प्रश्न वेगळेच असणार आहेत. निदान आजतरी आपापल्या शब्दांना काँग्रेस आणि वीज अधिकारी दोघांनीही ठामपणे जागावे. अन्य पक्षांना जेव्हा खरोखरची जाग येईल तेव्हा त्या त्या नेतृत्वाची आणि पक्षाचीही मनापासून तारीफ करू. जाग आली तर उत्तम, अन्यथा जनता हतबल आहे पण झोपलेली नाही हे देखील लक्षात ठेवावे.
—– *अविनाश पराडकर, सिंधुदुर्ग*
9422957575