प्रवास दरात 17.17 टक्क्यांची भाडेवाढ
दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपला असता एसटी महामंडळाने प्रवास दरात 17.17 टक्क्यांची भाडेवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ट्विटरच्या माध्यमातून या संदर्भातील माहिती दिली.
ही भाडेवाढ आजपासून (26 ऑक्टोबर) लागू होणार आहे.
कोरोना काळात एसटी महामंडळाला बसलेला मोठा फटका आणि डिझेलचे वाढलेले दर यामुळे तिकीट दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाला अधिकचे 50 कोटी रुपये गोळा होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले की, “कोरोना काळात मंडळाला बसलेला आर्थिक फटका आणि डिझेल दरवाढीमुळे एसटीचे प्रवासी भाडे 17.7 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. ही नवीन दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. महामंडळाने तब्बल तीन वर्षानंतर दरवाढ केली आहे.”
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार साधी जलद व रात्री सेवेसाठी प्रति टप्पा 9.7 रुपयांची वाढ करण्यात आली असून निम आराम व शयन आसनी सेवेसाठी प्रति टप्पा 12.85 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच शिवशाही सेवेसाठी प्रति टप्पा 13. 35 रुपये तर शिवनेरी सेवेसाठी 19.50 रुपये प्रति टप्पा दर आकारण्यात येणार आहे.
रातरानी सेवेच्या संदर्भात देखील महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून अतिरिक्त दर रद्द करण्यात आले आहेत. दिवसा व रात्री धावणाऱ्या बसेसचे तिकिट दर सारखेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीची भेट
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी आणि अधिकारी यांना दिवाळीची भेट देखील घोषित करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अडीच हजार तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपयाची दिवाळी भेट दिली जाणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची वाढ करण्यात आली असून प्रत्येक महिन्याला सात तारखेला होणारा पगार दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक नोव्हेंबरला केला जाणार आहे.