वेंगुर्लेतील पर्यटन कार्यशाळेस उस्फूर्त प्रतीसाद
पर्यटन संचालनालय आणि सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचे आयोजन
वेंगुर्ले
इटलीसारख्या सिंधुदुर्ग जिल्ह्या एवढे क्षेत्र असलेल्या देशात 20 हजार कृषि पर्यटन व्यवसाय कार्यरत आहे. या जिल्ह्यात कृषी क्षेत्र मोठे असल्याने कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे. त्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटन विकसित होऊ शकते. शासनाने पर्यटन विकास विकसित करण्यासाठी नवीन विभाग सुरू केलेला आहे, त्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक पर्यटन कार्यालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.
वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात पर्यटन संचालनालय ( DoT ) उपसंचालक हनुमंत हेडे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाय करु इच्छिणाऱ्या व्यवसायीकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये पर्यटन प्रशिक्षण संचालक मनोज हाडवळे, निसर्ग पर्यटनचे प्रमुख समन्वयक तथा संचालक संजय नाईक, तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड, पर्यटन महासंघ जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई , वेंगुर्ले तालुका अध्यक्ष दिनानाथ वेर्णेकर यांच्यासह सुमारे ७४ पर्यटक व्यवसायिक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना उपसंचालक हनुमंत हेडे पुढे म्हणाले की, पर्यटन संचालनालय महाराष्ट्र यांच्याकडे कोकणातील 150 जणांनी कृषी पर्यटनासाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. त्या प्रस्तावापैकी 50 जणांना परवानगी दिलेली आहे. उर्वरित प्रस्ताव अपूर्ण असल्याने त्यांची पूर्तता घेऊन त्यांना हि परवानगी दिली जाणार आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे येथे कृषी पर्यटन व्यवसायात खूप संधी आहे. आपण सर्वांनी याचा फायदा करून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यशाळेत अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रकिनारे, समृद्ध निसर्ग, गडकिल्ले, लोककला, खळाळते झरे, डोंगरदऱ्या, पोफळीच्या बागा, नारळ, काजू, फणस, भातशेती, छपराची घरे आदी सगळ आहे. याचा पर्यटनासाठी उपयोग होत असताना आपल्या वनातील, रानातील जमिनीचाही आपण कसा उपयोग कृषी पर्यटनासाठी करू शकतो असे सर्वांनी सांगितले. दरम्यान यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे येथील महेश सामंत यांना कृषी पर्यटन केंद्र मंजुरीचे सर्टिफिकेटस देण्यात आले.