You are currently viewing आंबेरी ग्रामपंचायतीचे उपोषण स्थगित – संतोष साटविलकरांच्या पाठपुराव्याने प्रश्न निकाली…

आंबेरी ग्रामपंचायतीचे उपोषण स्थगित – संतोष साटविलकरांच्या पाठपुराव्याने प्रश्न निकाली…

रस्त्याच्या दुरुस्तीचे कार्यकारी अभियंत्यांनी दिले लेखी आश्वासन

मालवण

चौके बावखोल आंबेरी धामापूर येथील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत आंबेरी ग्रामपंचायतीने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंत्यांनी नादुरूस्त रस्त्याची दुरूस्ती करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. त्यामुळे आंबेरी ग्रामपंचायतीने उपोषण स्थगित करण्याचे स्पष्ट केले.

तालुक्यातील चौके बावखोल आंबेरी धामापूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने वाहनधारकांचे हाल होत होते. या पार्श्‍वभूमीवर आंबेरी ग्रामपंचायतीने उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेने संबंधित मक्तेदार व कनिष्ठ अभियंता यांना ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्त्याच्या दुरूस्तीचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याची सूचना केली असून नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यत हे काम केले जाईल. कार्पेटचे काम जानेवारी २०२२ अखेरपर्यत पूर्ण केले जाईल. झाडी हटविण्याबरोबरच साईडपट्टीच्या कामाबाबतही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असल्याचे लेखी पत्र कार्यकारी अभियत्यांनी ग्रामपंचायतीस दिले आहे. त्यानुसार आंबेरी ग्रामपंचायतीच्यावतीने २५ ऑक्टोबरला केले जाणारे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. हा प्रश्‍न मार्गी लागावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर यांनी आवश्यक पाठपुरावा केला. यावेळी सरपंच साक्षी कांबळी, माजी सरपंच राजन सारंग, ग्रामपंचायत सदस्य सचिन आंबेरकर, किशोर वाक्कर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा