दोडामार्ग
भजन ही अशी उपासना आहे जिथे भगवंताशी एकरूप झाल्याचा भास होतो. तो अत्यानंद परम सुख देतो. त्यामुळे भजन कला जोपासणाऱ्या संगीत उपासकांचे कार्य कौतुकास्पद आहे, अशा भावना कोकणातील प्रसिद्ध ज्येष्ठ तबलावादक बंड्या धारगळकर यांनी व्यक्त केल्या.
केर चव्हाटा मंदिर येथे कै. फरा प्रतिष्ठान आयोजित अभंग गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विशेष अतिथी म्हणून श्री धारगळकर बोलत होते. त्यांच्यासमवेत जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबुराव धुरी, ज्येष्ठ संगीत अभ्यासक प्रभाकर गोसावी, अॅड पी.डी. देसाई, अॅड सोनू गवस, फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई, कुणकेरी सरपंच बाळा सावंत, घोटगेवाडी केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख सदाशिव पाडगावकर, मुख्याध्यापक सगुण कवठणकर, निवृत्त कृषी विस्तार अधिकारी रामा ठाकूर, ज्येष्ठ संगीत अभ्यासक गंगाराम देसाई आदी उपस्थित होते.
आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात दोन क्षण विसाव्याचे मिळून सगळा क्षीण जायचा असेल तर त्यासाठी भजनात क्रमांक होणे हाच उत्तम स्त्रोत आहे. भजनाची ज्याला आवड जडली त्याला समाधानाची चावी सापडली असे जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबुराव धुरी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून केर गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तुषार तुकाराम देसाई, रवींद्र भाऊ देसाई आणि महिला भजन मंडळ यांचा विशेष सन्मान तर अभंग गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त समृद्धी सावंत (कुणकेरी), दिलीप देसाई द्वीतीय (कोलझर), नितीन धामापुरकर (कुडाळ)तृतीय यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याच प्रमाणे संगीत क्षेत्रात योगदान देत असलेल्या ज्येष्ठ तबलावादक बंड्या धारगळकर यांसह प्रभाकर गोसावी, गंगाराम देसाई, प्रसाद गोसावी, पांडूरंग परब, अमित परब, जनार्दन नाईक, बाबाजी डांगे, गोविंद गावकर, सुनील बोर्डेकर आदींचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर केर गावातील भजन स्पर्धेत सहभागी स्पर्धकांचा ही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस देसाई प्रास्ताविक प्रेमानंद देसाई यांनी केले.