*निवडणुका डोळ्यासमोर ठेवत केलेली धूळफेक???*
प्लास्टिक बंदीसाठी कुडाळ नगरपंचायतीने प्लास्टिक बंदी अभियान सुरू केले. नगरपंचायतीने हॉटेल्स, दुकाने आदी अनेक ठिकाणी संपूर्ण कुडाळ शहरामध्ये १ जानेवारी २०१७ पासून प्लास्टिक बंदीची पोश्टर/नोटिसा लावण्यात आल्या आहेत. परंतु येत्या काळात असणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तर नगरपंचायत प्रशासन लोकांच्या डोळ्यात धूळफेक तर करत नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
कुडाळ शहरात नगरपंचायत हद्दीत प्लास्टिक वापरणाऱ्या व्यक्तीस ५००/- रुपये तर विक्री करणाऱ्या व्यापारी/दुकानदारास १०००/- रुपये दंडाची नोटीस लावली आहे. कुडाळ शहरातील ज्या हॉटेल्स आणि दुकानांवर अशा प्रकारच्या नोटिसा लावून शो बाजी केली आहे त्याच हॉटेल्स मध्ये पार्सल मात्र प्लास्टिकच्या पिशवीतूनच दिले जात असल्याचा प्रत्यय आज आमच्याच प्रतिनिधीला आला. त्यामुळे दुकानांवर लावलेल्या नोटिसा ही केवळ लोकांच्या आणि शासनाच्या डोळ्यात धूळफेक असल्याचेच दिसून येत आहे. राज्य, देश पातळीवर। सुंदर शहर, स्वच्छतेसाठी विविध पुरस्कार सरकारकडून दिले जातात, असे पुरस्कार प्राप्त करण्यासाठी जाहिरातबाजी करून सरकारच्या स्वच्छता विषयक येणाऱ्या प्रतिनिधींना शहराचे सर्वेक्षण करताना दिसण्यासाठी असे दिखाऊ बॅनर लावले जातात, परंतु त्यामुळे खरोखरच प्लास्टिक मुक्तीचा संदेश मात्र लोकांपर्यंत पोचत नाही तर केवळ योजना राबविणे एवढंच कार्य केलं जातं. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जर खरोखरच प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न केला आणि केवळ शासनाच्या तिजोरीत ५००/१००० जमा होण्याचे उद्दिष्ट न पाहता शहर स्वच्छतेचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलं तर नक्कीच कुडाळ शहर प्लास्टिक मुक्त होण्यास वेळ लागणार नाही.
कोणत्याही योजनेतून राजकीय महत्त्वाकांक्षा न साधता ती योजना जनहितार्थ कशी होईल याचा विचार कुडाळ नगरपंचायतीकडून झाला आणि शहरात प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं तरच शहर प्लास्टिक मुक्त होईल. कोरोना सुरू झाला तरी मास्क न लावणारे, मृत्युदर वाढताच घरात देखील मास्क लावत होते. शेवटी कोणतीही गोष्ट अंगवळणी पडण्यास वेळ लागतोच, परंतु त्यासाठी शासनकर्त्यांची प्लास्टिक मुक्तीसाठी तळमळ असली पाहिजे, समोरची व्यक्ती अगदी जवळची असली तरी कायद्यासमोर ती गुन्हेगारच असे जेव्हा समजून न्याय केला जाणार तेव्हाच अशाप्रकारच्या पोष्टरबाजी चा उपयोग होतो अन्यथा लग्न सोहळ्यात नटणाऱ्या नवरीप्रमाणे चेहरा रंगवला जातो, पोस्टर लावली जातात आणि पुन्हा सुरू होतो तो “ये रे माझ्या मागल्या…”