सावंतवाडी
ओटवणे येथील एका इसमाचा प्राणघातक हल्ल्यात जखमी झाल्यामुळे रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी उशिरा घडली आहे. प्रभाकर लक्ष्मण नाईक ( ६०, ओटवणे करमळ गाळू ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या डोक्यावर, हातावर व पायावर गंभीर जखमा झाल्यानंतर जखमी अवस्थेत स्थानिकांनी त्याला सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. हा हल्ला त्याच्या निकटवर्तीयांकडून फावड्याने झाला असल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, उपनिरीक्षक पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबु तेली, समीर सुतार, मातोंडकर आदी रूग्णालयात दाखल झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. रुग्णालय परिसरात ओटवणे येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.