विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण? शिक्षक भारतीचा प्रशासनाला सवाल
तळेरे
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्याचे कधीही भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान झाले. कोरोनाचे सावट सध्या कमी झाल्याने शासनाने 4 आॅक्टोंबरपासून शासनाने माध्यमिक शाळा सुरू केल्या पण, शिक्षकांची शाळाबाह्य कामगिरी मात्र कमी केलेली नाही.त्यामुळे शिक्षकावीणा विद्यार्थ्यांचे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी प्रशासनाला विचारला असून दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांच्या कोरोना ड्युट्या त्वरित रद्द कराव्यात अशी मागणी शिक्षक भारती ने दोडामार्गचे तहसीलदार तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी, आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
प्रदिर्घ काळानंतर आता कुठे विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात येऊ लागला आहे मात्र शासनाच्या इतर कामगिरीमुळे जर शिक्षक अध्यापन करण्यासाठी वर्गात राहिले नाही तर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालक वर्गातून विचारला जाऊ लागला आहे.
शिक्षक भारतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोडामार्ग मधील शिक्षकांना विनाकारण covid-19 पथकामध्ये ड्युटी लावण्यात आली आहे. सद्यस्थितीत शासनाने 4 ऑक्टोबर 2021 पासून माध्यमिक शाळा पाचवी ते बारावी वर्ग सुरू केले आहेत. दिवाळीपर्यंत प्रथम सत्र परीक्षा पूर्ण करावयाची आहे. परीक्षा घेण्यापूर्वी प्रथम सत्रचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. अशा स्थितीत शिक्षकांना ड्युटीला लावल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा प्रयत्न होत आहे. सध्या शासनाने सर्व गोष्टींवरील निर्बंध हटवले आहेत सगळ्या गोष्टी खुल्या केल्या आहेत. असे असताना शिक्षकांना मात्र नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षकांच्या चेकपोस्ट ड्यूट्या त्वरित रद्द करण्याचे आदेश पारित करावेत अशी मागणी केल्याची माहिती शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतूरेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, सचिव सुरेश चौकेकर,राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण,संघटक समीर परब तसेच दोडामार्ग तालुका अध्यक्ष शरद देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र खांडेकर, युवराज सावंत,सतिश धरणे,श्रीनिवास शिंगे यांनी दिली.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी तसेच शिक्षकांच्या कोरोना डुट्या रद्द करावी या मागणीसाठी शिक्षक भारतीने सलग नऊ दिवस साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले होते. त्यानंतर बहुतांश तालुक्यात शिक्षकांच्या कोरोना ड्यूट्या रद्द झाल्या मात्र,दोडामार्ग तालुक्यात माध्यमिक शिक्षकांना या ड्युट्या पुन्हा लावण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रातून प्रशासनाच्या या अजब कारभाराविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जर ड्युट्या रद्द झाल्या नाही तर शिक्षक भारती पुन्हा आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष वेतुरेकर यांनी दिला आहे .
फोटो
जिल्हा अध्यक्ष
संजय वेतुरेकर
सचिव सूरेश चौकेकर