जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री सौ.ज्योत्स्ना तानवडे यांनी विख्यात कवयित्री शांताबाई शेळकेंचा यांच्या जन्मदिवसानिमित्त लिहिलेली काव्यरचना
आज शांताबाई शेळके यांचा वाढदिवस, त्यांना विनम्र अभिवादन…💐
🙏अशा होत्या शांताबाई !!🙏
जणू वडीलधारी आक्का किंवा ताई
अशा होत्या शांताबाई !!
दिसणे त्यांचे राजसवाणे
हसणे त्यांचे लोभसवाणे
काव्या मधले स्निग्ध चांदणे
मुखावरती जणू विलसणे
त्यांची गाणी,त्यांची वाणी घंटा किणकिणत जाई
अशा होत्या शांताबाई !!
ती बालगीते, ती लावणी
ती प्रेमगीते, ती विराणी
विचार, प्रज्ञा,सौंदर्य, माधुरी
यांची सुरेल हातमिळवणी
या साऱ्यांचा चित्ताकर्षक काव्यौघ खळाळत जाई
अशा होत्या शांताबाई !!
कथा-कादंबरी, गीते-कविता
ललित लेख,अनुवाद समीक्षा
प्राध्यापिका,बालसाहित्यिका
भावसंपन्न साहित्य,रसिकता
एका बिंबातून असंख्य प्रतिमा उमटत जाई
अशा होत्या शांताबाई !!
विरहाला या नाव नसे
अंतरीचा हा भाव असे
या हृदयीचे त्या हृदयासी
भावबंध जुळाले जसे
मुकुट मस्तकी ल्याली शारदा ‘शांत-रत्न’ झळाळून जाई
अशा होत्या शांताबाई
अशा होत्या शांताबाई!!
ज्योत्स्ना तानवडे.
पुणे.५८