You are currently viewing रंग …..

रंग …..

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांचा लेख

किती मोठं स्थान आहे हो रंगांना आपल्या जीवनात ….!
रंगांशिवाय जीवनाची कल्पना करून पहा .. अरेरे ..
जीवनातला आनंद ८०/: टक्क्यांनी कमी होऊन जाईल..
जीवन अगदी सपक .. बेचव होऊन जाईल ..

देवालाही आपण श्रीरंग , नटरंग असे म्हणतो.सकाळ झाल्या
बरोबर पूर्वेला हा रंगांचा घडा घेऊन श्रीरंग आपल्यासाठी
उभा असतो. सूर्याची किरणे फाकताच हा घडा उपडा होतो नि
रंगांची जी जादुगरी निर्माण होते ती पाहून सारे विश्व थक्क
होऊन जाते. अनिमिष नेत्रांनी तो नजारा डोळ्यात साठवत
पक्ष्यांच्या कुजनाने आपली प्रसन्न पहाट सुरू होते व त्या रंगाऱ्याला वंदन करत आपला दिनक्रम सुरू होतो.

अहो .. त्याने किती रंग निर्माण केलेत आपल्या साठी ? काही
सुमार आहे का ? नुसत्या हिरव्या रंगाच्या छटा डोळ्या समोर
आणा.. अहो .. एकाच शेतात पेरलेल्या वेगवेगळ्या भाज्यांचे
रंग सुद्धा हिरवेच पण वेगवेगळ्या छटांमध्ये पाहून तर माझे डोके चक्रावूनच जाते ती विविधता पाहून …
काही काळ इंग्लंड मधल्या वास्तव्यात तेथील फुले व त्यांचे
रंग पाहून मी तर वेडीच होत असे. इतके अलोट सौदर्य की
शब्दात कसे पकडायचे ?
आणि विविध ऋतूत विविध फुले भाज्या फळभाज्या पाले
भाज्या त्यांचे विविध रंग … नसते तर … काय आणि कसे
ओळखले असते व नावे दिली असती आपण… ?

तीच गोष्ट पक्ष्यांची …!मनात आणाल त्या रंगाचा पक्षी आहे हो.. किती चेहरा खुलतो आपला मोराचा पिसारा पाहून
पिसाऱ्या सारखाच …अगदी कोणताही कल्पनेतला .. रंगांचा
आकाराचा पक्षी आहेच . ह्या फुलांच्या अपार सौंदर्याने रंगांनीच तर आपल्या जीवनात रंगत आणली आहे.म्हणूनच
जगात दृष्टी नसणाऱ्यांचे दु:ख्ख सगळ्यात मोठे आहे, त्यांना
एकच रंग माहित आहे काळा व तो काळाही त्यांना दिसत नाही,त्याची ही कल्पनात करावी लागते हे केवढे दुर्दैव आहे.

नुसत्या साडीच्या दुकानात गेलो तरी आपण वेडे होतो.
हा की तो ..? कोणता रंग घ्यावा ? सारेच रंग आपल्याला
मोह घालतात. बांगड्या , मेहेंदी , चुनरी.. ओढणी …
काय काय उदा. द्यावे ..?
नाही हो नाही रंगांशिवायच्या दुनियेची आपण कल्पनाच
करू शकत नाही .

आभाळाचा निळा रंग , त्याच्या विविध छटा..काळे करडे ,
पांढरे शुभ्र ढग , त्यांच्या हलणाऱ्या पालख्या , त्यांचे
अद् भूत आकार , सायंकाळी पुन्हा क्षितिजावर कुसुंबी
रंगांची रांगोळी .. अहाहा .. ते उन्हात फुलणारे इंद्रधनुष्य
काय वर्णावे… ? मंडळी रंग गंध चव आहे म्हणून जीवनालाही
चव आहे .. अन्यथा ….

असे हे रंगांचे वेड आपल्याला असल्यामुळे ज्याने हे रंग
निर्माण केले त्या खुद्द देवदेवतांनाही आपण रंगात रंगवून
टाकले.. रोज एक नविन रंगाची साडी … कोण नेसणार ?
देवीच्या नावाने आपण..
असो.. रंग आपल्याला खूप आनंद देतात हेच खरे आहे.

तर मंडळी अशी ही रंगाची दुनिया मोठी अद् भूत आहे ,
झाडांचे ही रंग पहा ना … पळस पांगारा बहावा गुलमोहोर
झाडेच पिवळी गुलाबी लाल शेंदरी दिसतात …
किती ही बोलले तरी कमीच पडेल रंगांविषयी ..
आता थांबते ….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा