You are currently viewing ९ ऑक्टोबर जागतिक टपाल दिन….

९ ऑक्टोबर जागतिक टपाल दिन….

विशेष संपादकीय….

अगदी काल परवा पर्यंत टपाल खाते म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित असलेला अविभाज्य घटक होता. जसजशी डिजिटल क्रांती होत गेली, तसतसे टपाल येणं हे मात्र क्वचित प्रसंगीच होऊ लागलं. शेवट शेवट टेलिफोन बिले येत होती ती सुद्धा आजकाल मोबाईल वर यायला लागली. व्यवस्था पेपरलेस झाली तसे टपाल सुद्धा बंदच झालं. आज टपालने येतात त्या बँकेच्या किंवा सरकारी नोटीसा आणि रक्षाबंधनाच्या राख्या….
१८५४ मध्ये भारतात टपाल कायदा अस्तित्वात आला आणि टपाल सेवेचे एकाधिकार टपाल खात्याला देण्यात आला. दीड लाखांवर टपाल कार्यालये असणारे जगातील सर्वात मोठे टपाल सेवेचे जाळे भारतात विणले गेले. स्वतंत्र भारताचे पहिले टपाल तिकीट २१ नोव्हेंबर १९४७ ला ‘जयहिंद’ नावाने प्रकाशित झाले होते. परंतु १९७२ ला पिनकोड पद्धत अंमलात आली आणि टपालसेवेने खरा वेग धरला.

गाव असो व दुर्गम खेडे टपाल सेवा ही एकमेव व्यवस्था होती जी खात्रीशीर पत्र असो वा मनिऑर्डर लोकांपर्यंत पोहचवीत होती. गावात पोष्टमन म्हणजे गावकऱ्यांच्या जवळचा माणूस. अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू, अनेकांच्या सुखदुःखाचा, प्रगतीचा साथीदार, एखाद्याच्या दुःखाची बातमी देताना देखील धिराचे चार शब्द बोलणारा नातेवाईक, मित्र सुद्धा पोष्टमन होता. उन्हापावसात, खाच खळग्यात, डोंगरदर्यात अगदी अनवाणी सुद्धा फिरणारा पोष्टमन म्हणजे अनेकांसाठी देवदूतच होता. दूरवर शहरात असलेल्या आपल्या जीवलगाची खुशाली असो, वा सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचे आपल्या आई-वडील, पत्नीस लिहिलेले भावना खोलवर दडलेले खुशालीचे शब्द…. त्या खुशालीच्या प्रेमाच्या शब्दांसाठी कित्येक घरांचे उंबरठे वाट पाहत असायचे डोळ्यात प्राण आणून… आपल्या मुलांचं खुशालीचे पत्र वाचता आलं नाही तरी म्हातारी माणसं कोणाकडूनही वाचून घ्यायची आणि आपला मुलगा सुखरूप आहे हे समजल्यावर भरले डोळे पदराने पुसायची, कपाळावर बोटं मोडून त्याच्या सुखासाठी देवाकडे मागणे मागायची…टपाल या भावनाच तर पोचवायचं घरी.
कधी परत येऊ हे न सांगता सीमेवर गेलेला जवान वेळ काढून आपल्या घरी पत्र लिहायचा. आठ पंधरा दिवस जायचे पत्र पोचायला. तोपर्यंत त्याची पत्नी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असायची…पोष्टमन काका येण्याची… “माझं पत्र आहे का काका?” असं औत्सुक्याने विचारायची आणि निराश व्हायची नकार आल्यावर. कित्येक दिवसांनी पत्र यायचं… न वाचताच धाय मोकळून रडायची,,,आनंदाच्या भरात. रॉकेलच्या दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात रात्री बेरात्री कित्येकदा वाचायची आणि आपला पती सुखरूप आहे याच खुशीतच डोळ्यांच्या कडा भिजवायची….
नोकरीसाठी परगावी शहरात गेलेला आपला पोटचा गोळा काय खात असेल, कामावर त्याला त्रास तर नसेल या विवंचनेत असणारी म्हातारी आई त्या पोराच्या पत्राची वाट पाहत असायची. पत्रात लिहिल्याप्रमाणे त्याने पाठवलेल्या मनीऑर्डर वर दिवस काढायची. पैसे किती पाठवले यापेक्षा तिच्यासाठी महत्वाचं असायचं त्याचं खुशालीचं आलेलं पत्र. “पैसे नाय धाडलस तरी चालात पण तू सुखी रव” हीच भावना असायची म्हाताऱ्या आईची. या भावनांची देवाणघेवाण करायचं ते टपाल खातं…
शाळा, कॉलेज संपवून मित्र मैत्रिणी आपल्या गावी जायच्या. वाढदिवस असो वा एखादा सण…. अगदी आठवण आली तरी त्या आठवणींना उजाळा द्यायच्या अंतरदेशीय पत्रात लिहिलेल्या चार शब्दातून आणि दुकानात भेटणाऱ्या शुभेच्छा पत्रातून. ती मित्र मैत्रिणींची पत्र आजही कित्येकांकडे संग्रही असतील, कारण त्या आठवणी असतात कायम जतन करण्यासाठीच्या….आपण टपालने पाठवलेल्या संदेशाच्या.
एप्रिल मे महिना आला की कोकणात आंबा बागायतदार वाट पहायचे ते टपाल ने येणाऱ्या आंब्याच्या पेटीच्या पट्टीची…. मुंबईत मार्केटमध्ये पाठवलेल्या पेटीचा दलालाने काय दर काढला आणि खर्च वजा होऊन किती पैसे उरलेत याची उत्सुकता असायची. काळ बदलला कुरियर, मोबाईल आले….टपाल येणे बऱ्याचअंशी बंद झाले. व्हिडिओकॉल, फोनच्या माध्यमातून माणसे जवळ आली. दळणवळणाची साधने झाली, एका दिवसात माणूस एक दुसऱ्यांपर्यंत पोहचू लागला….
….परंतु पत्रातील ते मजकूर वाचण्यात जो आनंद मिळायचा….तो मात्र पत्रातील मजकुरातच राहिला…

प्रतिक्रिया व्यक्त करा