You are currently viewing डॉ. विजय जगताप यांचे संशोधन पेटंट मंजूर

डॉ. विजय जगताप यांचे संशोधन पेटंट मंजूर

सावंतवाडी

येथील यशवंतराव भोसले फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अर्जुन जगताप यांना भारतीय पेटंट कार्यालयाकडून त्यांच्या संशोधनाकरिता पेटंट मंजूर करण्यात आले आहे. सदर संशोधन हे रसायन विज्ञानासंबधित असून डॉ. जगताप यांनी ते डिसेंबर २०१७ ला दाखल केले होते.


सूक्ष्मजीवी, बुरशीजन्य रोगावर तसेच कर्करोग व क्षयरोग यावरील उपचारासाठी औषध द्रव्यांची नवीन संश्लेषण प्रक्रिया त्यांनी याद्वारे मांडलेली आहे. संश्लेषण प्रक्रियेतून नवीन निर्माण झालेल्या रासायनिक संयुगाचा प्राथमिक संशोधनात कर्करोगावर क्रियाशीलता आढळून आलेली आहे. याकरिता निरनिराळ्या पेशींचा वापर केला असून आय. सी. ५०, सायटोटोक्सीसिटी चाचणी अंतर्गत निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत. भविष्यात वैद्यकीय पद्धतीने याच्या अधिकाधिक चाचण्या होणे गरजेचे आहे व याकरिता डॉ. जगताप प्रयत्नशील आहेत.
रासायनिक विभागांतर्गत मिळालेले पेटंट हे सल्फोनामाईड, बेंजोथायाझोल आणि हेटेरो संयुगाचा वापर यावर आधारित असलेल्या नवीन संश्लेषण प्रक्रियेस मिळालेले आहे. सदर संशोधनाकरिता त्यांना कर्नाटक येथील डॉ. जयचंद्रन यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.
डॉ. विजय जगताप हे जळगाव येथील असून त्यांनी जे.एन.टी.यू., हैदराबाद येथून पी.एच.डी. केली आहे.
सावंतवाडी येथे २०१५ पासून भोसले नॉलेज सिटी येथील मुंबई विद्यापीठ संलग्नीत फार्मसी विभागात ते प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोंसले, अध्यक्षा अस्मिता सावंतभोंसले, सचिव संजीव देसाई, समन्वयक सुनेत्रा फाटक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व फार्मसी क्षेत्रातील वर्गाने त्यांचे अभिनंदन केलेले आहे व पुढील वाटचालीकरिता शुभेछचा दिलेल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा