You are currently viewing “तुमचा व्यवसाय – आमचे प्रशिक्षण”
कोकण हेल्पलाईनचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात अभिनव उपक्रम

“तुमचा व्यवसाय – आमचे प्रशिक्षण”

कोकण हेल्पलाईन या उद्योजकीय चळवळ राबवणाऱ्या संस्थेमार्फत आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावात काहींना काही उद्योग करू पाहणाऱ्या नवउद्योजकांना त्यांच्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या नवउद्योजकाना त्यांच्या व्यवसायासाठी लागणारे मार्गदर्शन व सल्ला, प्रशिक्षण, त्या संदर्भातली योजनांची माहिती आणि बँकेत कर्जसहाय्य मिळवून देण्यासाठी मदत अशा प्रत्येक पातळीवर मदतीची यंत्रणा उभी करण्याच्या दिशेने कोकण हेल्पलाईन प्रयत्न करत आहे. कृषी व अन्य क्षेत्रातील सर्व प्रशिक्षणे शक्यतोवर मोफत आणि अन्य काही प्रशिक्षणे अत्यल्प फी मध्ये उपलब्ध करून देण्यात येतील, असे कोकण हेल्पलाईनचे कार्याध्यक्ष श्री राजेश साळगावकर व प्रकाश साळुंखे (मुंबई विभाग) यांनी सांगितले.

सर्व कोकणवासीय जनता, कोकणातील उद्योजक, कोकणमध्ये काम करणाऱ्या विविध संस्था, प्रत्येक गावातील सरपंच, त्या गावातील आर्थिक सक्षम व समाजसेवक व्यक्ती या सर्वांना एकत्र आणून कोकणात उद्योग करू इच्छिणाऱ्या युवावर्गाला प्रत्येक पावलावर मदत करणे, हे कोकण हेल्पलाईनचे ध्येय आहे. संस्थेने आवाहन केले आहे की अशा प्रकारे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या युवकांनी आपली माहिती 9422379484 या व्हाट्सअप क्रमांकावर शक्यतो आपला मेसेज पाठवून कळवावी. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनी देखील या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत, आपण यासाठी आपले काय योगदान देऊ शकतो, याविषयी कळवावे. प्रत्येक गावात युवकांचा किमान एक शेतकरी बचतगट संस्था मान्यताप्राप्त करून घेईल व त्या गटाच्या माध्यमातून त्या गावातील उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर करत उद्योगनिर्मिती करण्यात येईल. यासाठीही पुढाकार घेऊ इच्छिणाऱ्या युवकांनी व सहकार्य देण्यास तयार असलेल्या ग्रामपंचायतींनी संपर्क करावा, असे आवाहन श्री.राजेश साळगावकर आणि श्री.प्रकाश साळुंखे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा