आजपासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे. ही नवरात्र देशभरात सर्वत्र विविध पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्रात घटस्थापनेला महत्त्व आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करण्याचा प्रघात आहे.
नवरात्रासोबत येतो तो उत्साह आणि उत्सव. नऊ दिवसांच्या या उत्सवात देवी दुर्गाच्या नऊ स्वरुपांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस सर्वात महत्वाचा असतो कारण त्यादिवशी घटस्थापना होते. घटस्थापनेचा शाब्दिक अर्थ म्हणजे घट वाढणे. याला महानवरात्री असेही म्हणतात. पहिल्या दिवशी शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री अशी नऊ रूपे नऊ दिवस पुजली जातात. यंदा गुरुवार, 7 ऑक्टोबर 2021 रोजी घटस्थापना केली जाईल. अश्विन घटस्थापना मुहूर्त – सकाळी 06:17 ते 07:06 पर्यंत
घटस्थापना अभिजीत मुहुर्त – सकाळी 11:45 – 12:32 दुपारी. घटस्थापना मुहूर्त प्रतिपदा तिथीला येतो. प्रतिपदा तिथी 06 ऑक्टोबर रोजी 16:34 वाजता सुरु होईल, प्रतिपदा तिथी 07 ऑक्टोबर रोजी 13:46 वाजता संपेल.
घट बसतेवेळी देवीची पूजा करावी. पूजा केलेला टाक घ्यावा. अभिषेक करावा नंतर स्थापना करावी. स्थापना करण्यापूर्वी प्रथम पाट घ्यावा. त्यावर गहू पसरून पाण्याने भरलेला कलश ठेवावा. पाण्यात पैसे, सुपारी घालावी. तांब्यावर गव्हाने भरलेले लहान ताम्हन ठेवावे. त्यात देवीचा टाक ठेवावा. हळद-कुंकू गंध, फुल यांनी पूजा करावी. या दिवशी गव्हाचे महत्त्व जास्त असते. पाटापुढे शंख, घंटा ठेवावी. खाली पत्रावळ ठेवून पत्रावळीवर चाळलेली काळी माती टाकून गहू, पुन्हा माती, पुन्हा गहू पेरावेत. असे दोन तीन वेळा करावे. मध्ये पेल्यासारखे भांडे ठेवून त्यांची पूजा करावी.
यात पाणी, हळद, कुंकू वाहून फुलांची माळ करून त्यावर सोडावी. कलशाची पूजा करावी. पाटावर रांगोळी काढावी. कारळ्याच्या फुलांची किंवा झेंडुच्या फुलांची माळ करावी. ही फुले मिळाली नाहीत, तर अन्य कोणत्याही सुवासिक फुलांची माळ नवरात्रीत नऊ दिवस घटावर रोज एक याप्रमाणे बांधावी.
शक्य झाल्यास नवरात्रीत नऊ दिवस चोवीस तास समई तेवत ठेवावी. ज्या दिवशी एका तिथीचा क्षय असेल त्या दिवशी दोन वेळा माळा घालून नऊ दिवसांच्या माळा पूर्ण कराव्यात. रोज आपण फराळाचे जिन्नस करतो, त्यांचा नैवेद्य दाखवून नंतर फराळ करावा. रोज सायंकाळी देवीची आरती, जप, पोथीवाचन करावे.
नवरात्रीत बसवला जाणारा घट हा पंचमहाभूतांचे प्रतीक आहे. ही पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, आप, तेज आणि वायू. घटस्थापनेच्या निमित्ताने आपण पंचमहाभूतात वसलेल्या देवांना आपल्या घरात येण्याचे आमंत्रण देतो. या चराचरात सामावलेली ऊर्जा घटस्थापनेमुळे आपल्या घरात एकवटते आणि त्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाने वास्तुदोष दूर होतात. घरात शांतता नांदते. देवीच्या आगमनाबरोबर घरात नवचैतन्य, उत्साह, ऊर्जा यांचा समावेश होतो.
नवरात्रात अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे नवरात्रोत्सवाला एक आगळंवेगळं महत्व आले आहे. नवरात्रात गरबा, रास दांडिया इत्यादी खेळून सणाचा आनंद द्विगुणित केला जातो. सणाच्या काळात दांडिया, गरबा आदी नृत्यांमुळे वेगवेगळ्या समाजातील लोक एकत्र येतात त्यामुळे एकोपा वाढीस लागतो. सुवासिनी स्त्रिया देवीची खणा नारळाने ओटी भरून आपली मनीषा देवीला सांगतात. नऊ दिवसांच्या उत्सवानंतर प्रतिष्ठापना केलेली देवीची मूर्ती वाजतगाजत विसर्जित केली जाते.