सर पावसाची आली,
कानाकानात बोलली,
जा रे वावरात राया,
पिकं डोलाया लागली.
सर पावसाची आली,
सृष्टी न्हाऊनीया गेली,
ओलीचिंब झाड वेली,
पाने फुले आनंदली.
सर पावसाची आली,
गाय हंबराया लागली,
गोठ्यातल्या वासराची,
चिंता मना सतावली.
सर पावसाची आली,
वाट पाण्यात डुबली,
मायच्या काळजीपोटी,
पोरं उंबऱ्यावर बैसली.
सर पावसाची आली,
लाकडे चुलीत सारली,
निखाऱ्यांच्या धगीने,
तव्यार भाकरी फुलली.
सर पावसाची आली,
हवा थंडगार झाली,
बाळं लेकरं उबेसाठी,
आईच्या कुशीत शिरली.
सर पावसाची आली,
चिंतेत माय-बाप बुडाली,
मातीच्या चार भिंतींना,
आस पाण्याची लागली.
सर पावसाची आली…!
(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६