You are currently viewing नियम मोडणाऱ्या भाजी,फळे विक्रेत्यावर कणकवली न.प. ची कारवाई

नियम मोडणाऱ्या भाजी,फळे विक्रेत्यावर कणकवली न.प. ची कारवाई

पटवर्धन चौकातच फ्लायओव्हर ब्रिज खाली आखून दिलेल्या जागेत विक्रेत्यांनी बसावे प्रशासनाचे आवाहन

कणकवली

भाजी, फळ, फुले विक्रेत्या करिता कणकवली पटवर्धन चौकातच फ्लायओव्हर ब्रिज खाली जागा आखून देण्यात आलेली असताना, काही विक्रेत्यांकडून नगरपंचायत च्या सूचना पायदळी तुडवत रस्त्यालगत पुन्हा दुकाने थाटण्यास सुरुवात करण्यात आली.त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर नियम मोडणाऱ्यांवर नगरपंचायत कडून कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

त्या पार्श्वभूमीवर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आज गुरुवारी दुपारी कणकवली बाजारपेठ रस्त्यावरील भाजी व हातगाडी विक्रेत्यांना हटवत त्यांना नेमून दिलेल्या जागेच्या ठिकाणी व्यवसाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच डीपी रोड व पटवर्धन चौकात, बांधकाम कार्यालयाच्या समोर अन्य ठिकाणच्या विक्रेत्यांना या सूचना दिल्या. या सूचना दिल्यानंतरही जे विक्रेते रस्त्यालगत बसलेले आढळतील त्यांच्या त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी दिली.

कणकवली शहरात भाजी, फळे, फुले व हातगाडी विक्रेत्यांना जागेचे नियोजन करून देण्यात आले होते. गणेश चतुर्थी नंतरच्या काळातही शहरात वाहतूक कोंडी उद्भवू नये व सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून हेच नियोजन पुढील काळासाठी कायम ठेवण्यात आले आहे. मात्र शहरात बाजारपेठ रस्त्यावर तर भाजीविक्रेते व हात गाडी वरील विक्रेत्यांकडून हे नियोजन पायदळीतुडवले. हातगाडी विक्रेत्यामुळे बाजारपेठेत वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते. तसेच डीपी रोडवर देखील भाजी विक्रेत्यांकडून दुकाने थाटण्यात आली होती. त्याच सोबत कणकवली शहरातील मराठा मंडळ रोड नजीक बांधकाम कार्यालया समोर देखील रस्त्यावरच भाजी – फळे विक्रेत्यांनी दुकाने मांडल्याने या नियोजनाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत होते.

मुख्याधिकारी श्री तावडे यांनी डीपी रोड वरील कारवाईचा प्रत्यक्ष उपस्थित राहत आढावाही घेतला. दरम्यान नगरपंचायत पथकाकडून दुपारच्या सत्रात सूचना दिल्यानंतर सायंकाळी ट्रॅक्टर व कर्मचारी सोबत घेऊन यासंदर्भातील मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत नगर पंचायत कर्मचारी रवी महाडेश्वर, प्रशांत राणे, संतोष राणे, प्रवीण गायकवाड, सचिन तांबे, विशाल होडावडेकर आदींनी सहभाग घेतला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा