अतुल काळसेकर यांची माहिती; ७ ऑक्टोंबरला आयोजन, तीनही विधानसभा मतदारसंघात नियोजन बैठक…
वेंगुर्ले
भारतीय जनता पार्टीच्या समर्थ बूथ अभियानामध्ये महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील शक्ती केंद्र प्रमुख व प्रभारी यांच्याशी ७ ऑक्टोंबर रोजी भाजपचे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व्हर्च्युअल संवाद साधणार आहेत. त्या अनुषंगाने ३ऑक्टोंबर ला जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लोकसभा मतदार संघाचे बुथ संयोजक अतुल काळसेकर यांनी दिली.
राज्यामध्ये सध्या कोणतीही मोठी निवडणूक नाही. मात्र भाजपातर्फे कार्यकर्त्यांची साखळी निर्माण करून त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी समर्थ बूथ अभियान राज्यात राबविले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९१६ बूथ अंतर्गत २०९ शक्तिकेंद्र सक्रिय करण्यात आली आहेत. यातील ७०० बूथ ना पक्षाची मान्यता मिळाली. उर्वरित बूथ ना लवकरच मंजुरी मिळणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सविधानिक कारकिर्दीला ७ ऑक्टोंबर रोजी २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील ९२ हजार शक्तीकेंद्र प्रमुख व शक्तीकेंद्र प्रभारी यांच्याशी व्हर्च्युअल संवाद साधणार आहेत. त्या अनुषंगाने ३ ऑक्टोबर रोजी कोकण विभागीय संयोजक सतीश निकम व जितेंद्र डाकी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
सावंतवाडी मतदार संघाची बैठक येथील सावंतवाडी येथे काजी शाहबुद्दिन हॉल येथे सकाळी १० वाजता होणार आहे. याची जबाबदारी प्रसन्ना देसाई यांच्याकडे आहे. मालवण- कुडाळ मतदार संघाची बैठक पिंगुळी येथील एकांत रिसॉर्ट येथे दुपारी २ वाजता. याची जबाबदारी बंड्या सावंत व रणजित देसाई यांच्याकडे आहे. तर कणकवली मतदार संघाची बैठक कणकवली येथील प्रहार भवन येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे. याची जबाबदारी जयदेव कदम यांच्याकडे आहे. यावेळी भाजप सरचिटणीस नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली हे मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती श्री. काळसेकर यांनी दिली. यावेळी वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणिस प्रसन्ना देसाई, जिल्हा कार्यकारीणी सदस्य साईप्रसाद नाईक, रवींद्र शिरसाट आदी उपस्थित होते.