आरोग्य विभागाच्या भरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परीक्षा केंद्र द्यावे
आ. वैभव नाईक यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी
कोविड-१९ च्या काळामध्ये अविरतपणे काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून या कोरोना योद्ध्यांना त्वरीत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच भविष्यात आरोग्य भरती प्रक्रियेत भरती झाल्यास प्राधान्याने या कर्मचा-यांना कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्यात यावे. तसेच शासनाच्या कोणत्याही विभागामध्ये सदरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समाविष्ट करण्यात यावे. अशी मागणी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यावर ना. राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रदीप व्यास यांना यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, आरोग्य कर्मचारी प्राजक्ता माळवदे, हार्दिक कदम, गिरीधर कदम, प्रणाली चव्हाण, अमित वजराटकर, नारायण पिंगूळकर आदि उपस्थित होते.
कोविड-१९ च्या काळात या आरोग्य कर्मचा-यांनी जीवाची पर्वा न करता कोरोना रूग्णांची सेवा केली आहे. स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता आलेल्या प्रसंगाला साथ देत शासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. सदरील कर्मचा-यांना शासनाच्या आरोग्य विभाग किंवा इतर कोणत्याही विभागामध्ये कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्याबाबत सबंधितांना आदेश व्हावेत अशी विनंती आमदार वैभव नाईक यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यामध्ये रिक्त असलेल्या जागांसाठी मेगा भरती जाहीर केली. या रिक्त जागा भरण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यानुसार पदांची जाहिरातप्रसिद्ध करून पदे तात्काळ भरण्याकरिता परीक्षा जाहीर केली. सदर नियोजित भरतीकरिता परीक्षा पुढे ढकलण्यात आली परंतु सदर परीक्षेकरिता सिंधुदुर्ग जिल्हा हे परीक्षेचे केंद्र म्हणून जाहीर केले नव्हते. सदर परीक्षेकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून अनेकांनी अर्ज केला असून त्यांना परीक्षेकरिता जिल्ह्यामधून अन्य ठिकाणी प्रवास करावा लागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी परीक्षा केंद्र झाल्यास जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थीना हे सोयीचे जाणार आहे. तरी राज्य शासनाने जाहीर केलेल्या आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता परीक्षा केंद्र निश्चित करण्यात यावे अशी मागणी देखील आमदार वैभव नाईक यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यावर ना.राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तांना याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.