You are currently viewing ते १९१ कोटी ९ ऑक्टोबरला विमानाने ‘उडवून’ आणणार काय..? -अमित इब्रामपूरकर

ते १९१ कोटी ९ ऑक्टोबरला विमानाने ‘उडवून’ आणणार काय..? -अमित इब्रामपूरकर

….. तर आमदार वैभव नाईक यांचा “मनसे सत्कार” करणार… !

मालवण

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत गेल्या दोन वर्षांत झालेल्या कामांपैकी ११३ कोटी आणि रस्त्यांच्या खड्डे दुरुस्तीचे ७८ कोटींचा निधी मिळून १९१ कोटींचा निधी येत्या ९ ऑक्टोबरला सुरू होणार्‍या मुंबई-सिंधुदुर्गविमानतळ उद्घाटनादिवशी विमानातून ‘उडवून’ आणणार आहात काय ? असा जळजळीत सवाल मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी आमदार वैभव नाईक यांना केला आहे.

आमदारांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलेल्या मालवण तालुक्यातील ९ कामे आणि कुडाळ तालुक्यातील १४ कामे एप्रिल नंतर मंजुर आहेत कार्यारंभ आदेश सुद्धा काढला असला तरी ठेकेदार अगोदरची बिले प्रलंबित असल्याने ही नवीन कामे सुरू करणार काय ? नवीन कामे सुरू केल्यानंतर झालेल्या कामांची रनिंग बिले पाठवून निधींची मागणी होत असते तो निधी ठेकेदारांना मिळणार काय ? जर ठेकेदार अपयशी आमदारांमुळे आणि निधी अभावी रस्त्यांची कामे उरकणार नसतील तर जनतेला अजुन किती दिवस खड्ड्यांमधून वाट काढत राहावे लागणार याचेही उत्तर आमदारांनी द्यावे.रस्त्यांच्या कामावर देखरेखीसाठी आवश्यक स्थापत्य अभियंते बांधकाम विभागाकडे नाहीत.कर्मचारीवर्गही अपुरा आहे.येत्या पावसाळ्यानंतरही हे रस्ते टिकणार काय?
गेल्या दोन वर्षापासून झालेल्या रस्त्यांच्या कामांना ११३ कोटी निधी नाही हे कणकवली आणि सावंतवाडी विभागाच्या दोन्ही कार्यकारी अभियंत्यांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासमोर मान्य केले होते.तर पुरपरिस्थितीने खास बाब म्हणून मंजुर झालेल्या खड्ड्यांच्या कामांना ७८ जाहीर केलेला निधी अद्याप प्राप्त नाही आणि आता एप्रिल नंतर नवीन रस्त्यांच्या कामांना निधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.त्यामुळे खोटे बोल पण रेटून बोलण्याचे आमदांनी थांबवावे.आज जनता सत्ताधारी लोकप्रतिनिधींना खड्ड्यांमुळे कंटाळलेली आहे.प्रवास करताना जनता सत्ताधार्‍यांना मालवणी भाषेतून शुभेच्छा देत आहे.ही वस्तुस्थिती असली तरी आमदार पत्रकार परिषदा घेवुन वारंवार माध्यमांसमोर खोटं बोलून जनतेला फसवत आहेत.
वास्तविक आमदार वैभव नाईक यांच्यात निधी आणण्याची धमक नाही.प्रशासनातील अधिकार्‍यांवर वचक नाही.तरी सुद्धा येत्या ८ दिवसात हा सर्व निधी आमदारांनी आणल्यास मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते तुमचा ‘मनसे सत्कार’ करु असेही मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा