You are currently viewing मधुपोळे … काटेरी …

मधुपोळे … काटेरी …

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

दु:ख्खाचा ना होतो सोहळा किती वाटले मना
दु:ख्ख न वाटून घेते कोणी मोडून टाकतो कणा
स्वप्न नि आशा यांच्या वरती उभे राही जीवन
वादळ येता पेटून उठती घेती उभे झेलून …..

जरी न दिसती चेहऱ्यावरती सुकलेले आसू
तावून सुलाखून निघतो माणूस उसने ते हासू
निरखून घेतो गाळून घेतो तरी न चुकती काटे
ठिगळ लावा पहा किती ही आसमंत ते फाटे …

उन्हे जाळती पाय पोळती साथ सोडे सावली
पुरे काजवा पणती तेव्हा बने पहा माऊली
थकले जरी हो पाय किती ही चालावे लागते
पाठलाग ती करती पहाना रात्रीची हो भुते …

आनंदाने झोळी भरावी असे जरी वाटले
सुख एवढे मनुजाहाती आणावे कोठले
होईल होईल आस सांगते माणूस चालतो पुढे
चढून जातो अपयशाचे उंच उंच ते कडे….

हळूच येते चाहूल कशाची देते हुलकावणी
हवालदील होऊनच मग डोळा येते पाणी
तरी न थांबे रस्त्यावरती चालत राही पुढे
कधी तरी लागतात हाती मधुभरले ते घडे …

एका एका थेंबासाठी मधमाशी ती झटते
कष्टातून त्या अपार त्यांच्या मग मधु साठते
तसेच आहे जीवन आपुले आहे मधुसंग्राम
पोळ्यासाठी रात्रंदिन तू कर पहा काम …

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा