You are currently viewing कणकवली, कुडाळात मटका व्यवसायाला अभय कोणाचा?

कणकवली, कुडाळात मटका व्यवसायाला अभय कोणाचा?

अवैद्य व्यावसायिकांची दहशत?

जिल्ह्यात दिवसेंदिवस अवैद्य व्यवसायांना पेव फुटले असून सत्ता कोणाचीही असो वा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोणीही येवोत, अवैद्य व्यवसायांना आळा बसत नाही, उलट दिवसांमागून दिवस जातात, बेरोजगारी, बेकारी वाढते तसे अवैद्य व्यवसाय जोर धरतात आणि या अवैद्य व्यवसायांमध्ये तरुणांना, युवकांना ओढले जातात.
सावंतवाडीतील मटका व्यवसायावर अधूनमधून कारवाई होत असते, त्यामुळे अवैद्य व्यवसायांवरच्या केसेसचे टार्गेट सावंतवाडीत पूर्ण केले जात आहे, परंतु कणकवली आणि कुडाळात मोठ्या प्रमाणावर मटका व्यवसाय सुरू असून बिनधास्तपणे टपऱ्यांवर मटका घेतला जातो, त्यांना कोणाचेच भय राहिलेले नाही. त्यामुळे कणकवली व कुडाळात निर्धास्तपणे सुरू असलेल्या मटका व्यवसायाला अभय कोणाचे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक कणकवली कुडाळ येथे निर्धास्तपणे सुरू असलेल्या मटका व्यवसायाशी अनभिज्ञ आहेत आणि एलसीबी, स्थानिक पोलीस प्रशासन यांना कारवाई करण्याचे धाडस होत नाही. शहरातील सुशिक्षित बेरोजगार तरुण मटका सारख्या अवैद्य व्यवसायात गुंतल्याचेही दिसून येत असून त्यामुळे तरुणाई प्रगतीकडे वाटचाल करण्यापेक्षा विनाशाकडे वाहवत जात असल्याचे दिसून येते.
कुडाळ कणकवलीत सुरू असणाऱ्या मटका व्यवसायावर कारवाई होत नसल्याने अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांची दहशत असल्याची दिसून येत आहे. अवैद्य व्यावसायिक दहशत निर्माण करतात त्याला राजकीय आश्रय आहे का? राजकीय आशीर्वादानेच कुडाळ, कणकवलीत अवैद्य व्यवसाय चालतो का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. बिनधास्तपणे कुडाळ, कणकवलीत सुरू असलेल्या अवैद्य मटका व्यवसायावर जिल्हा पोलिस अधिक्षकांकडून कारवाई होणार की नाही? याच प्रतीक्षेत शहरवासीय आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा