हात मागे नको घेऊ …
दही हंडी गणपती काला गोपाळांचा दंगा
धामधूम सारीकडे कुठे चाले नाच नंगा
उधळण लक्षुमीची कुठे पडतात फाके
झोपडीत माय कुणी दारिद्र्याला रोज झाके…..
दरी इतकी का खोल उंच पर्वताचे कडे
उठताच पडते हो रोज पोटाचे साकडे
सारीकडे धामधूम सण होतात साजरे
चव्हाट्यावरच येते माऊलीची ती लाज रे…
मांडवातल्या पंगती अन्न सांडते ते किती
दारावरती झुंबड मागतांना वाटे भीती
माय वाढावो म्हणती पोटात ती पेटे आग
दया येते ना कुणाला असतात महाभाग ….
एकामागून ते सण होई चंगळ मंगल
पैसे जाळती फटाके सुने झोपडी अंगण
जन्म घ्यावा कुणी कुठे नाही हातात कुणाच्या
नाही तर केल्या असत्या मागण्या महालाच्या …
डोळे उघडे ठेवून सारे पाहतोस देवा
तुझ्या शांतपणाचा रे बघ वाटतोच हेवा
नको बनू स्थितप्रज्ञ दे ना पोटाला भाकरी
पोट रिकामे असता कशी करावी चाकरी …?
तुझी सेवा दूर देवा कसे आठवावे तुला
दोर प्रपंचाचा अडे कसे साडवावे त्याला
दोष नको गरिबांना बघ कधीच तू देऊ
थोडी कृपा त्यांच्यावर,हात मागे नको घेऊ ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)