असे व्यक्तिमत्त्व होणे नाही
मुंबई सचिवालयातून उच्च पदावरून सेवानिवृत्त झालेले व सावंतवाडी भंडारी समाजाचे आधारवड, ज्येष्ठ कार्यकर्ते, मार्गदर्शक रमाकांत राजाराम तुळसकर यांचे काल रात्री ८.०० वाजण्याच्या सुमारास गोवा येथे उपचार सुरू असतानाच निधन झाले. सावंतवाडी भंडारी “समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली, समाजाबद्दल खरी तळमळ असणारा कार्यकर्ता हरपला, समाजाचे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व हरपले, असे व्यक्तिमत्त्व होणे नाही अशा शब्दात भंडारी समाजातील अनेक मान्यवरांनी रमाकांत तुळसकर यांच्या बद्दल भावना व्यक्त केल्या.
मंत्रालयातून उच्च पदावरून निवृत्त होऊनही समाजातील लहान थोर सर्वांशीच त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बाजारपेठेत असो व तलावाकाठी फिरताना वाटेत भेटणाऱ्या सर्वांशीच ते मायेने बोलायचे. दुसऱ्यांच्या यशात त्यांना आनंद वाटायचा, काम करणाऱ्या प्रत्येकाला ते शुभेच्छा द्यायचे, पाठबळ द्यायचे त्यामुळे समोरच्या प्रत्येकाला ते आपलेच वाटायचे. सावंतवाडीतील भंडारी समाजात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती, त्यांचा प्रेमळ स्वभाव लाघवी बोलणे यामुळेच ते अनेकांना प्रिय होते.
काल रात्री ८.०० वाजता रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. सावंतवाडीतील भारतमाता हॉटेलचे गौरव तुळसकर यांचे ते वडील होते, तर भारतमाता हॉटेलचे मालक व व्यापारी संघ सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर यांचे ते भावोजी होते. आज सकाळी मातोंड या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.