You are currently viewing अखेर चिपी विमानतळाला डिजीसीएचा परवाना मिळाला; खासदार विनायक राऊत

अखेर चिपी विमानतळाला डिजीसीएचा परवाना मिळाला; खासदार विनायक राऊत

सिंधुदुर्ग
अखेर बहुप्रतिक्षित असलेल्या आयआरबी सिंधुदुर्ग एयरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडच्या एसपीव्हीला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडून (डीजीसीए) चिपी विमानतळासाठी चालन परवाना प्राप्त झाला आहे अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी तळगाव येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांना दिली

आयआरबी कंपनीनेही याबाबतचे एक पत्र जारी केले आहे
या एरोड्रोम लायसेन्समुळे आता चिपी विमानतळ एयरलाईन्स आणि सर्वसामान्य जनतेसाठी खुला करणे कंपनीला शक्य होईल. आयआरबी इन्फ्रा च्या एसपीव्ही कंपनीने विकसित केलेला हा पहिला ग्रीनफील्ड एयरपोर्ट प्रकल्प आहे. कोकण संपूर्ण देशासोबत जोडले जाण्यासाठी चिपी विमानतळ खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा प्रकल्प कोकणात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी आणि स्थानिकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कंपनीला जारी केलेल्या परवान्यामध्ये डीजीसीएने नमूद केले आहे की, “या परवान्यामार्फत विमानतळ हे विमानामार्फत सर्व व्यक्तींना समान अटी व शर्तीसह उतरण्यासाठी आणि येथून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नियमित जागा म्हणून वापरण्यासाठी अधिकृत करत आहे, ज्यामध्ये धावपट्टी आणि संबंधित सुविधांच्या तपशिलांची आवश्यकता असते, यामध्ये विमानतळ मॅन्युअलमध्ये सूचित करण्यात आलेल्या मंजुरी देण्यात आलेल्या सर्व सवलतीप्रमाणे किंवा त्यापेक्षा कमी सवलतींचा समावेश आहे.”

कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र डी. म्हैसकर यांनी सांगितले, “विमानतळाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर संचालनाचा परवाना मिळवून यंदाच्या वर्षी अजून एक मोठा टप्पा पार केल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ९० वर्षापेक्षा जास्त कन्सेशन कालावधी आणि क्षेत्रीय क्षमता यामुळे हा प्रकल्प प्रगतीच्या अनेक वाटा खुल्या करेल. या नव्या सुविधेच्या उभारणीत मौल्यवान सहकार्य आणि पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही संबंधित सर्व प्राधिकारणांचे आणि हितधारकांचे आभार मानतो. एयरलाईन कंपन्या आणि सर्वसामान्य जनतेसाठी हा विमानतळ लवकरच खुला होईल.”

सिंधुदुर्ग विमानतळाचा खर्च जवळपास ८०० कोटी रुपये असून कन्सेशन कालावधी १० वर्षापेक्षा जास्त आहे. दक्षिण कोकण क्षेत्रातील हा अशाप्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिणेकडील राज्ये, मुंबई व त्यानंतर देशातील अनेक वेगवेगळे भाग हवाईमार्गे जोडले जावेत, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या विमानतळावरून प्रवासी वाहतूक तर होईलच, शिवाय कार्गो वाहतुकीला वेग प्राप्त होईल, ज्यामुळे कोकणच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, स्थानिक लोकांसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या व इतर उद्योगव्यवसायांच्या मुबलक संधी उपलब्ध होतील. देशाच्या पश्चिम विभागाचे कार्गो केंद्र बनण्याची क्षमता या विमानतळामध्ये आहे. कारण त्याठिकाणी भरपूर प्रमाणात जागा उपलब्ध आहे. तसेच भविष्यातील वाढत्या गरजानुसार त्याची व्याप्ती वाढवता येणे शक्य आहे, असे संचालकांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा