You are currently viewing जिल्हा बँक टिकविण्यासाठी पक्षविरहीत पॅनेल उभे करावे – परशुराम उपरकर 

जिल्हा बँक टिकविण्यासाठी पक्षविरहीत पॅनेल उभे करावे – परशुराम उपरकर 

कणकवली

जिल्हा बँकेची निवडणूक जशी जवळ येत आहे, तसे मतदारांना विविध पक्षांकडून आमिषे दाखवली जात आहेत. मतदारांना प्रलोभने दाखविणाऱ्यांच्या हातात जिल्‍हा बँक सुरक्षित राहू शकत नाही. त्‍यामुळे मतदारांनीच पुढाकार घेऊन पक्षविरहीत पॅनेल निवडणुकीत उभे करावे. त्‍याला मनसे सर्वतोपरी मदत करेल असे आवाहन मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आज केले.

येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आता जवळ येऊन ठेपली असताना सर्वच राजकीय पक्षांची प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे. या निवडणुकीत ज्यांना ज्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे, त्यांना निवडणुकीला उभे राहणारे संभाव्य उमेदवार भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मतदारांना आमिष देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या पक्षाच्या हातात बँक सुरक्षित राहू शकणार नाही. त्यामुळे ज्यांना बँकेबद्दल, जिल्ह्याबद्दल आणि मतदारसंघातील संस्थांबद्दल आपुलकी आहे आणि विकास करायचा आहे, त्यांनी या कोणत्याच राजकीय पक्षांत न जाता स्वतंत्र पॅनेल उभं करावं. मनसे त्यांना सर्वतोपरी मदत करेल.

ते म्‍हणाले, भाजपच्या एका आमदाराची १४ कोटी रक्कम थकीत असल्याची बातमी बाहेर आली. हे १४ कोटी शिक्षण संस्थेला देणारी हीच कार्यकारीणी होती. भाई सावंत पतसंस्थेला ७ कोटीचं कर्ज दिलं होतं. ते आता वीस कोटींवर गेलं. त्यावेळी मी दफ्तर जमा करण्याकरता प्रश्न उपस्थित केला आणि दफ्तर जमा करण्याचा आदेशही झाला. परंतु आताचे भाजपा जिल्हाध्यक्ष आणि त्यावेळचे काँग्रेसचे आमदार राजन तेली यांनी बँकेची बाजू उचलून धरली आणि दफ्तर जमा न करण्याची मागणी केली. अशा पद्धतीने जनतेच्या पैश्याची उधळपट्टी चालवली आहे. जिल्ह्यातल्या अनेक बिल्डर लॉबींना शेतीच्या नावाखाली कर्ज देऊन त्या कर्जामधून काही मलिदा मिळवण्याचा प्रयत्न या बँकेकडून झालेला आहे. त्यावेळी हे सर्वजण एकत्र होते आणि आपापल्या लोकांना कर्ज मंजूर करत होते. परंतु आता वेगवेगळ्या पक्षांत गेल्यामुळे एकमेकांविरुद्ध उभे आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा