You are currently viewing आता शेतकऱ्यांना स्वःतच स्वतःच्या पिकांच्या नोंदी करण्यासाठी पारदर्शक सुविधा उपलब्ध

आता शेतकऱ्यांना स्वःतच स्वतःच्या पिकांच्या नोंदी करण्यासाठी पारदर्शक सुविधा उपलब्ध

गाव नमुना १२ अद्यावत करण्याची एकमेव सुविधा उपलब्ध

सिंधुदुर्ग :

राज्य शासनाच्या ई पीक पाहणी या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये मोबाईल ॲपव्दारे पिकांची प्रत्यक्ष नोंदणी व पिकांची माहिती छायाचित्रासह शेतकऱ्यांनी अपलोड करावीत. यासाठी राज्य स्तरावर शिबीरे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकरी स्तरावरील कामाची कालमर्यादा १५ सप्टेंबर वरुन ३० सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या शिबीरांचा लाभ घ्यावा. माहिती अपलोड करण्यास काही अडचण आल्यास तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

दि. १५ ऑगस्ट २०२१ पासून ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यभर राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत शासनाव्दारे ई पीक पाहणी हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपव्दारे शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पीक पेरणीची माहिती भरण्यासाठी सजास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तलाठी व कृषी सहाय्यक हे प्रशिक्षक म्हणून नेमले आहेत. हे प्रशिक्षक सर्व शेतकऱ्यांना ई- पीक पाहणी या मोबाईल ॲपचा वापर कसा करावा याविषयी प्रशिक्षण देत आहेत.

पूर्वी तलाठी गावामध्ये दवंडी देवून व प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक पाहणी करून पिकांच्या नोंदी घेत असत. यानंतर संगणीकृत ७/१२ वर पीक पेऱ्याच्या नोंदी करण्यात येवू लागल्या. आता बदलते स्वरूप म्हणून शेतकऱ्यांना स्वतःच स्वतःच्या पिकांच्या नोंदी करण्यासाठी पारदर्शक सुविधा उपलब्ध झाली आहे. यापुढे याच पध्दतीने नोंदी करावयाच्या आहेत. गाव नमुना १२ अद्यावत करण्याची ही एकमेव सुविधा उपलब्ध राहणार आहे.

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी वारस नोंदी शिबीरांचेही आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत-जास्त या सर्वाचा लाभ घेवून आपल्या पिकाची नोंद आपण स्वतःच करावी आणि शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा