*भल्या भल्यांना अस्मान…*
गजाननाची लाडकी नि व्यासांची लेखणी
वाल्या वाल्मिक लिहितो रामाची कहाणी
रामदासांची शिवथर …घळीत दासवाणी
दोहे कबीर डोळ्यात, पहा आणतात पाणी…
अशी देखणी देखणी खूप देखणी लेखणी
ज्ञानेश्वरांची लाडकी आणि तुकोबांची वाणी
घरी संतांच्या संतांच्या रोजच भरे पाणी
एकनाथांची नाथांची सुगम भागवत वाणी…
ही लेखणी गुणाची आहे गुणाची फारच
हिच्याशिवाय जीवन असे खचित हारच
हार पडती गळ्यात तिला हाती ती घेताच
हाती घेण्याच्या आधी ती,तुम्ही वाचाच वाचाच …
हाती येताच लेखणी, वाहती ज्ञानाचेच पाट
जनलोकात लेखणी जाते जाते पहा थेट
जनमानस वळते असे तिचीच ताकद
थयथयाट करते तिचा लागताच नाद …
ही लेखणी तलवार येता कापत सुटते
तोल जाताच मनाचा,मनाचा भरकटते
धार दुधारी करते मनामनाला घायाळ
कधी कधी बनते ती नको तितकी मधाळ…
भुलविते ती मनाला आणि भुरळ घालते
भल्याभल्यांना भिडता पहा किती पळविते
लोकातून उठविते.. कधी सत्कार करते
कारागृहाची नेत्यांना वाट थेट दाखविते..
चमत्कार ती करते अन् डोक्यावर घेते
नाहीतर हो थेटच पहा भुई दाखवते
हिचा लागत नाही हो कधी कधी थांगपत्ता
उलथवून ती टाकते क्षणातच महासत्ता..
हाती येता ती कोणीच कधी उतूमातू नये
तिचे असावे मनात अहो नेहमीच भय
बाजू उलटे कशी ती कसे समजत नाही
काळे फासते तोंडाला हीच लेखणीची शाई…
शाणपणाने करावा तिचा नेहमी वापर
फोडू नये उगाचच कुणावर ही खापर
ती नक्षत्र चांदणी आहे मोठीच देखणी
भल्याभल्यांना आस्मान आणि पाजते ती पाणी…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)