*सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांच्या नावाचा होतो वापर*
गणेशोत्सव सुरू झाला की जुगाराच्या बैठकांचा देखील उत्सव सुरू होतो. अनेक ठिकाणी जिल्ह्यातील मोठमोठे जुगारी जुगाराच्या बैठका बसवतात. या बैठका बसवताना आपल्याला त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणच्या प्रशासनाला आमदार, मंत्री, नेते यांची नावं सांगून थोपवलं जातं. अशाचप्रकारे खारेपाटण पासून दोन किमी वरील उजव्या बाजूला असलेल्या एका बंद हॉटेल नजीकच्या मंगल कार्यालयात जुगाराची भली मोठी बैठक बसत आहे. या बैठकीत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर बसलेल्या या जुगाराच्या बैठकीसाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगून पालकमंत्र्यांचा नावाचा अगदी बिनढोकपणे वापर केला जात आहे. राजकीय व्यक्तींच्या नावाचा वापर करून जुगाराच्या बैठका बसत असल्याने संबंधित प्रशासन मूग गिळून गप्प आहे.
गौरी गणपतीच्या सणात लाखोंची उलाढाल होणाऱ्या जुगाराच्या बैठका जिल्ह्यात राजकीय आशीर्वादाने जोरदारपणे सुरू असल्याने हे जिल्ह्याचेच दुर्दैव आहे असे बोलले जात आहे.. जिल्ह्यात नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आली होती त्यावेळी शिवसेनेला त्याची ऍलर्जी होती, परंतु त्याच शिवसेनेच्या सचिव पदावर असलेल्या आणि जिल्ह्याचे खासदार असणाऱ्या विनायक राऊत यांच्याच मतदारसंघात राजकीय आशीर्वादाने जुगाराच्या मैफिली झडताहेत हे जिल्ह्यासाठी दुर्दैवी आहे. राजकीय आश्रय असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळेच जुगाराच्या बैठकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन धजावत नाही.
खारेपाटण येथील जिल्ह्याच्या सीमेवर सुरू असलेल्या जुगाराच्या बैठकांच्या बाबत तक्रारीचा दूरध्वनी रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला गेला त्यामुळे खाकी वर्दीने बैठकीच्या म्होरक्याला आजचा दिवस बैठक बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. खारेपाटण येथील बैठकीमध्ये सावंतवाडीतील एका जुगाऱ्याचे चार लाख रुपये नुकसान झाले, त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये जोरदार राडा झाला होता आणि बैठक बंद पडली होती. रात्री जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठकीचा फड बसला असून जुगाराच्या बैठकीने जोर धरला आहे. एकीकडे जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांवर बंधने लादली जात आहेत, गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे, परंतु राजकीय आश्रयामुळे सुरू असणाऱ्या जुगाराच्या अड्डयांवर मात्र कोणतीही कारवाई दोन्ही जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाकडून होत नसल्याने खारेपाटण सीमेवर सुरू असणाऱ्या जुगाराच्या बैठकांना खरोखरच दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा आशीर्वाद आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.