You are currently viewing गोवा बनावटीची भेसळयुक्त दारूचा अवैद्य धंदा….

गोवा बनावटीची भेसळयुक्त दारूचा अवैद्य धंदा….

दारू वाहतूक आणि विक्रीसाठी होतोय तरुणाईचा वापर…

संपादकीय…..

गोवा आणि सिंधुदुर्गचे दारू कनेक्शन हे बरंच जुने आहे. दुचाकी, चारचाकी मधून चोरटी दारू वाहतूक करून कित्येक गावात दारूचे छुपे धंदे चालत होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून गोव्याच्या दारूची जिल्हाभरच नव्हे तर राज्यातील कितीतरी ठिकाणांसाठी चोरीछुपे वाहतूक सुरूच आहे. काहीवेळा गाड्या पकडल्याही जातात, पण त्या फक्त लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी किंवा खाकी अथवा एक्साईजवाल्याना मिळणारा हफ्ता चुकला तरच….!
सिंधुदुर्गात मोजकेच गोवा बनावटीच्या दारूचा धंदा करणारे होते. परंतु दारूच्या धंद्यात कमी कालावधीत मिळणारा पैसा आणि ऐश्वर्य पाहून पैशाच्या लालसेपोटी अनेक जण या अवैद्य धंद्यात उतरले आहेत. काळ्या धंद्यासाठी दिल्या जाणारा हफ्ता या गोंडस नावामुळे त्यांना ना खाकीची भीती राहिली ना एक्साईजची. त्यामुळे मिळेल त्या वाटेने, मिळेल तशी दारूची वाहतूक अगदी बिनदिक्कतपणे व्हायला लागली आहे.
सावंतवाडी हे गोवा बनावटीच्या दारूचे केंद्र बनले आहे, कारण दारूचा गोंधळ करणारे दारूच्या धंद्यातील बादशाह सावंतवाडीतच आहेत. स्वतःचे परमिटरूम असल्याने त्यांना गोव्याची दारू सावंतवाडीत आणून अगदी बाटलीच्या बुचापासून लेबलपर्यंत सर्व काही बदलून भेसळ करून भेसळयुक्त दारू अगदी बेमालूमपणे स्वतःच्या बार मध्ये विकता येते. कित्येक लोकांच्या पार्ट्या अगदी जंगलात, बंगल्यात झडतात, आणि त्या पार्ट्यांमध्ये जाग्यावर साध्या एका फोनवर दारू पोच दिली जाते ती पैशांसाठी हापापलेल्या आणि दारुवाल्यांच्या ऐश्वर्यावर भाळलेल्या तरुणाई कडून. अनेक तरुण गिर्हाईक असेल तिथे दारू पोच करतात.बाटलीमागे ५०/- रुपये मिळविणारे हे तरुण मात्र दारूचा गोंधळ घालणाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेले आहेत. पैशांसाठी वाट्टेल ते करण्याच्या तयारीत असणाऱ्या या तरुणांचा वापर दारूची वाहतूक करणारे दारू वाहतुकीसाठी सुद्धा करतात. गोव्यात दारू भरायला जाताना रिकामी गाडी नेहमीच गोव्यात ये जा करत असेल तर संशय येतो, म्हणून 15/16 वर्षांच्या कोवळ्या मुलांचा गाडीतील प्रवासी म्हणून वापर करून प्रवासी भरलेली गाडी गोव्यात नेतात व येताना दारू भरून आणतात. नेलेल्या मुलांना दुचाकीवरून पुढे पायलटिंगसाठी पाठवतात, असा दुहेरी वापर करून घेतात. काम झाल्यावर त्या युवकांच्या हातावर बियरची बाटली आणि ५०० रुपये टेकवतात. त्यामुळे कोवळ्या वयातच कॉलेजची मुलं व्यसनाकडे आणि पैसा मिळतो म्हणून गुन्हेगारीकडे वळले जातात.
दारूचे बादशाह दिवस रात्र फिरायला मुलांना दुचाकी, चारचाकी गाड्या देतात, त्यामुळे ऐशआरामाची जिंदगी भेटल्याचा साक्षात्कार झालेली तरुण मुलं धंद्यात ओढली जातात, आणि एकदा का ती गैरमार्गावर असताना पोलिसांच्या रडारवर आली की कायमची गुन्हेगार म्हणून ओळखली जातात त्यामुळे ऐन तारुण्यातच अशी तरुण मुलं आयुष्याची वाट लावून घेतात.
हफ्ता म्हणून मिळणाऱ्या काही पैशांसाठी आपले इमान विकणारे खाकीचे रखवालदार अवैद्य दारू धंद्यातील बादशहाना सलाम करत राहिल्याने सावंतवाडीतील तरुण पिढी मात्र बरबादीकडे झुकत आहे. भविष्यात खाकीच्या रखवालदारांपैकी कोणाचा मुलगा दारुवाल्यांचा विळख्यात सापडला तरी पैशासाठी खाकीची इज्जत वेशीवर टांगणारे खाकीचे रखवालदार गैरधंद्यांना सोबत करणार का?

क्रमशः

प्रतिक्रिया व्यक्त करा