You are currently viewing जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

*प्रेमात नाहलो मी ….*

प्रेमात नाहलो मी पुरता पहा बुडालो
मी फुलपांखरू ग फुलांसवे उडालो
मधुगंध हा तुझा मी श्वासात घे भरूनी
गजरा पहा तुझा हा घमघमतो दुरूनी.

मी प्रेमवेडा वीर पापणी तुझ्या रहातो
अन् आसवांसवे ग मी वाहूनीही जातो
तू रातराणी धुंद वाऱ्यासवे डुलावी
चाफ्यात ग पहा ती मम पापणी अडावी

तू चंद्र सूर्य माझा शुक्राची चांदणी तू
नवलक्ष चांदण्यात तू दिसते ग उठूनी
नयनात तूच राधा मज होई प्रेम बाधा
हृदयात स्पंदने तू मी आहे साधासुधा

ओठांवरी तुझे ग मम गीत मीच गातो
मी निशीदिनी तुला ग ओठात आळवितो
तू विश्व आहे माझे तू आहे माझा देव
कुपीत अत्तराच्या अनमोल अशी ठेव

सांधून विश्व माझे तू फूल उंबराचे
मम भाग्य थोर आहे उपकार ग तयाचे
प्रेमात नाहलो मी पुरता पहा बुडालो
मी फुलपांखरू ग फुलांसवे उडालो

प्रा.सौ. सुमती पवार ,नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा