*जागतिक मराठी ” साहित्य कला व्यक्ती” विकास मंचची सदस्या — ज्योत्स्ना तानवडे यांची काव्यरचना*
सूर छेडिले मधुर
जशा सरीवर सरी
गोकुळाला वेड लावी
कान्हाची धुंद बासरी ||
वसे मोहन अधरी
हेवा वाटे गोपिकांना
भाग्य तुझे असे मोठे
याचे कारण सांगना ||
बासरीची ती साधना
कधी कुणा ना कळते
सर्वसंग परित्यागे
नतमस्तक ती होते ||
अहंकार त्यजुनीया
झाली पोकळ आतूनी
षडरिपू दूर होती
सहा छिद्रांच्या मधूनी ||
‘मी’पण नसे तियेला
शांत सदैव रहाते
फुंकर घालीता कान्हा
शीळ मधुर वाजते ||
परिपूर्ण या गुणांनी
चीज अनोखी बासरी
मुरलीधराला प्रिय
धरी सदैव अधरी ||
कान्हाच्या स्वरसंगमी
सारे विश्व वेडे होते
कृष्ण बासरीचे ऐसे
अद्वैत घडून येते ||
ज्योत्स्ना तानवडे.
वारजे.
9423400492
सुंदर रचना आहे, ज्योत्स्ना ताई…!
.. प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह ,गुरुकृपा संस्था.
फार सुंदर कविता