मुंबई
भाजपचे लोकप्रिय माजी आमदार सरदार तारासिंह यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने लिलावती रुग्णालयात निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
गेल्या काही दिवसांपासून सरदार तारासिंह हे आजारी होते. त्यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तारासिंह यांच्या निधनाची बातमी ट्विटरवरून दिली आहे. मुलुंड येथे आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
तारासिंह हे अत्यंत लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार म्हणून प्रसिद्ध होते. जनसंघातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या तारासिंह यांनी विविध पदे भूषविली होती. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या तारासिंह यांनी मुलुंड विधानसभेचं दीर्घकाळ प्रतिनिधीत्व केलं. २०१८ साली त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नांदेड च्या सचखंड गुरुद्वारा बोर्ड च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिला होता. तारासिंह यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.