You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस पगाराच्या प्रतीक्षेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस पगाराच्या प्रतीक्षेत

गणेशोत्सव तोंडावर येऊनही प्रशासन सुस्त

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात कोरोना काळात उन्हातानात, पावसात उभे राहून प्रामाणिकपणे आपली ड्युटी बजावणारे पोलिसच आज गणेशोत्सव दोन दिवसांवर आला तरी पगारापासून वंचित आहेत. दर महिन्याच्या दोन तारीखला होणारे पोलीस खात्याचे पगार आज सात तारीख येऊनही प्रतिक्षेतच आहेत. त्यामुळे गणेशोत्सव आला तरी कोणाच्या चुकीमुळे पोलिसांचे पगार अडकलेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गणेशोत्सवास दोन दिवस शिल्लक राहिल्याने व पोलीस कर्मचारी स्वतः बंदोबस्तात व्यस्त असताना त्यांच्या कुटुंबीयांनी पगार न झाल्याने गणेशोत्सवाची तयारी करायची कशी? असा प्रश्न पोलिसांना सतावत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी अहोरात्र रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य पार पाडत असतात. सण सोहळे त्यांच्यासाठी रस्त्यावरच साजरे होतात, त्यांना बऱ्याचदा घरच्या सणाला सुद्धा जाता येत नाही. अशा वेळी पगार रखडले तर आयुष्यभर प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणारे पोलीस मात्र अडचणीत सापडतात. पोलीस प्रशासनाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचे पगार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत व कर्मचाऱ्यांचे पगार ऐनवेळी का रखडले याची योग्य ती चौकशी करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा